भारताचा ऐतिहासिक पराक्रम; तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
यश काशीकर
अहमदाबाद
wins t20 world cup नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने भारतीय संघाने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २००७, २०२४ आणि २०२६ अशा तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला. तसेच मायदेशात विश्वचषक जिंकणारा आणि किताबाचे यशस्वीपणे संरक्षण करणारा पहिलाच देश ठरला.
 
 

world cup 
 
 
या ऐतिहासिक विजयात संजू सॅमसनने पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिका बजावली. त्याने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावांची तुफानी खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या सामन्यात त्याला हा पुरस्कार मिळाला. संपूर्ण स्पर्धेत ५ डावांत ३२१ धावा (सरासरी ८०.२५) करत त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताबही आपल्या नावावर केला.
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच किवी गोलंदाजांवर हल्ला चढवत अवघ्या ६ षटकांत बिनबाद ९२ धावा फलकावर लावल्या. स्पर्धेतील पॉवरप्लेमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
अंतिम सामन्यापूर्वी फारशी लय सापडली नव्हती अशा अभिषेक शर्माने मात्र या मोठ्या सामन्यात धमाकेदार पुनरागमन केले. त्याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावत भारताला झंझावाती सुरुवात करून दिली.
यानंतर संजू सॅमसननेही आपली शानदार लय कायम ठेवत डावाची सूत्रे हाती घेतली. त्याला डावखुरा इशान किशनची भक्कम साथ मिळाली. किशनने केवळ २१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावांची झंझावाती खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या ४७ चेंडूत १०५ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
डावाच्या अखेरच्या टप्प्यात शिवम दुबेनेही तुफानी फटकेबाजी करत केवळ ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह २६ धावा केल्या. त्यामुळे भारताने २० षटकांत ५ बाद २५५ अशी प्रचंड धावसंख्या उभारली. न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने ३ गडी बाद केले, तर मॅट हेन्री आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
२५६ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात डळमळीत झाली. फिन अ‍ॅलन (९), रचिन रवींद्र (१) आणि ग्लेन फिलिप्स (५) स्वस्तात माघारी परतले. अ‍ॅलनला अक्षर पटेलने झेलबाद केले, तर जसप्रीत बुमराहने रवींद्रला बाद करत भारताला आणखी यश मिळवून दिले. त्यानंतर अक्षरने फिलिप्सला त्रिफळाचीत करत किवी संघाची अवस्था ४७/३ अशी केली.
त्यानंतर टिम सायफर्टने भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत ५ षटकार आणि २ चौकारांसह ५२ धावांची झंझावाती खेळी केली; मात्र वरुण चक्रवर्तीने त्याचा अडथळा दूर केला. हा त्याचा स्पर्धेतील १४ वा बळी ठरला आणि तो स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.
कर्णधार सँटनर (४३) आणि डॅरिल मिचेल (१७) यांनी २८ चेंडूत ५२ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र वाढता धावगतीचा दबाव आणि भारतीय गोलंदाजांची अचूक मारा यामुळे किवी संघ कधीच सामन्यात परतू शकला नाही.
अखेर न्यूझीलंडचा डाव १९ षटकांत १५९ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर पुन्हा आपले नाव कोरले.
भारताकडून जसप्रीत बुमराहने ४, अक्षर पटेलने ३ तर हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.