मध्यपूर्वेतील तणावाचा धक्का...सेन्सेक्स २००० हून अधिक अंकांनी घसरला

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Sensex falls by 2000 points मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा मोठा परिणाम सोमवारी देशातील शेअर बाजारावर दिसून आला. व्यवहार सुरू होताच बाजारात मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुरुवातीच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दोन हजारांहून अधिक अंकांनी घसरून सुमारे ७४ हजार ८३७ या पातळीवर आला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही मोठ्या प्रमाणात कोसळत सुमारे २३ हजार ८३१ या पातळीवर पोहोचला.
 
 
Sensex falls by 2000 points
 
 
या घसरणीत अनेक मोठ्या कंपन्यांच्या समभागांवर दबाव दिसून आला. विशेषतः श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एव्हिएशन, एशियन पेंट्स, एल अँड टी आणि अदानी पोर्ट्स या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरले. मात्र ओएनजीसी आणि कोल इंडिया या काही कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ दिसून आली. बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक घसरणीत व्यवहार करत होते आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक जवळपास चार टक्क्यांनी खाली आला. मध्यम व लघु उद्योगांच्या समभागांचे निर्देशांकही सुमारे तीन टक्क्यांनी घसरले.
 
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रति बॅरल तेलाचा दर शंभर डॉलरच्या पुढे गेल्याने जागतिक पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली असून अनेकांनी शेअर बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. रुपयाचे मूल्य कमी होण्याची शक्यता आणि तेल आयातीचा खर्च वाढण्याची भीती यामुळेही बाजारावर दबाव वाढला आहे.