मेच्या पहिल्या आठवड्यात १०वी आणि १२वीच्या निकालाची शक्यता

२० एप्रिलपर्यंत उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण करण्याचे लक्ष्य

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
नागपूर,
10th and 12th results first week of May महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, ही प्रक्रिया २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर गुणांची पडताळणी व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.नागपूर जिल्ह्यात यावर्षी १२वीच्या परीक्षेला ६५ हजार ४९९ विद्यार्थी, तर १०वीच्या परीक्षेला ५८ हजार ४५८ विद्यार्थी बसले होते. १२वीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर १०वीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्चपर्यंत पार पडली. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका मूल्यांकन केंद्रांवर पोहोचवण्यात आल्या असून, तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
 
 
 
first week of May
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर विभागीय कार्यालयात सुमारे १ हजार २०० शिक्षकांकडून १५ एप्रिलपर्यंत उत्तरपत्रिकांची प्राथमिक तपासणी सुरू आहे. त्यानंतर गुणांमधील अचूकता आणि साम्य तपासण्यासाठी छाननी केली जाणार आहे. २० एप्रिलपर्यंत संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.यानंतर सर्व गुण ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदवून पुण्यातील मुख्यालयात पाठवले जातील. अंतिम टप्प्यातील प्रक्रियेनंतर नेहमीप्रमाणे मेच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल.
कॉपी प्रकरणांची सुनावणी सुरू
नागपूर विभागात १०वी-१२वी परीक्षांदरम्यान ४३ कॉपी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामध्ये १२वीतील २७ तर १०वीतील १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांची सुनावणी सुरू असून विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जात आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषी विद्यार्थ्यांवर एक ते तीन परीक्षांची बंदी घालण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कॉपी झालेल्या केंद्रांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय राज्य शिक्षण विभागाकडून घेतला जाईल.