शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा

भामा-आसखेड धरणात समाधानकारक पाणीसाठा

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
पुणे,
Bhama Askhed Dam खेड तालुक्यातील भामा नदीवरील भामा-आसखेड धरणात यंदा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणात ५.३२ टीएमसी म्हणजेच सुमारे ६३.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, अजून दोन महिने उन्हाळा बाकी असतानाही ही स्थिती आशादायक मानली जात आहे.
 

Bhama Askhed Dam water level 2026, 
८.१४ टीएमसी क्षमतेचे हे महत्त्वपूर्ण धरण खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजविहीरे परिसरात स्थित आहे. या धरणावर खेड, शिरूर, दौंड आणि हवेली या चार तालुक्यांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा मोठा भार अवलंबून आहे. याशिवाय पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणातील साठ्याची स्थिती संपूर्ण परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते.
दरम्यान, यंदा १४ मार्च रोजी धरणातून पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनामुळे भामा-भीमा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे तब्बल १८ बंधारे पाण्याने भरले गेले. धरणापासून दौंड तालुक्यातील आलेगावपागा पर्यंत पाण्याची उपलब्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पिकांना पाणी मिळण्याबरोबरच विविध पाणीपुरवठा योजनांनाही मोठा आधार मिळाला आहे.सध्या धरणातील Bhama Askhed Dam पाण्याची पातळी ६६५.६८ दशलक्ष घनमीटर इतकी नोंदवली गेली आहे. एकूण पाणीसाठा १५०.६३५ दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १४७.११३ दशलक्ष घनमीटर इतका आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, यंदाचा पाणीसाठा मागील वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याने परिस्थिती अधिक स्थिर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार Bhama Askhed Dam पुढील काळात आवश्यकतेनुसार धरणातून आणखी पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. एकूणच, भामा-आसखेड धरणातील समाधानकारक साठ्यामुळे शेती, पाणीपुरवठा आणि नागरी जीवनाला मोठा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.