भोर
unseasonal hailstorm भोर शहरासह ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी गारपीठ आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांचे छप्पर उडाल्यामुळे सामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आले असून, हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेला आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांना या नैसर्गिक आपत्तीत मोठा फटका बसला आहे.
भर पावसात आणि गारपिठीने काढणीस आलेल्या रब्बी हंगामातील गहू, कांदा, ज्वारी यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, आंबा बागांनाही या अवकाळीचा फटका बसला असून बागायतदार शेतकऱ्यांचा उत्साह बुडाला आहे. शेतीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, जनावरांसाठी साठवलेला चारा भिजल्यामुळे त्यांच्या पालनपोषणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
वादळी वाऱ्याचा वेग इतका unseasonal hailstorm प्रचंड होता की अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने आणि खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. तालुक्यातील वडगाव डाळ येथे ग्रामदेवता यात्रेनिमित्त उभारलेला मांडव उडून गेला. उज्वला विजय चव्हाण यांच्या घराचे छप्पर उडून सुरेश यदु गायकवाड यांच्या घरावर पडल्याने त्यांचे घरही नुकसानग्रस्त झाले आणि ते जखमी झाले आहेत. इतर गावांमध्ये देखील घरांची पडझड झाली असून नागरिक अतोनात हाल बेहाल झाले आहेत.अचानक आलेल्या या संकटामुळे अनेकांचे धान्य, कपडे आणि संसारोपयोगी वस्तू पावसात भिजून खराब झाल्या आहेत. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी शासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. पीडित कुटुंबे “आम्ही जगायचे कसे?” असा प्रश्न उपस्थित करत आहेत. स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरत आहे.