बेंगळूर
Couple dies in Bangalore कर्नाटकची राजधानी बेंगळूर येथे एका तरुण दांपत्याच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कोथनूर परिसरात राहणाऱ्या अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असलेल्या पती-पत्नीने अल्पावधीतच आपले प्राण गमावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांची ओळख भानू चंद्र रेड्डी आणि त्यांची पत्नी शाझिया अशी झाली असून, दोघेही मूळचे तेलंगणा येथील असल्याची माहिती आहे. ही घटना थानीसंद्र मुख्य रस्त्यावरील एका उंच निवासी इमारतीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीने स्वतःला घरात बंद करून घेतले होते. बराच वेळ कोणतीही हालचाल न झाल्याने पत्नीला संशय आला. तिने इमारतीतील सुरक्षारक्षक आणि शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा उघडण्यास मदत मागितली. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर समोर आलेले दृश्य अत्यंत धक्कादायक होते. पतीचा मृतदेह घरात आढळून आला. ही घटना पाहून पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला. काही वेळातच ती इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेली आणि तेथून खाली पडल्याने तिचाही मृत्यू झाला. या सलग घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक तपासात पती-पत्नीमधील वैवाहिक वाद हे या घटनेमागील संभाव्य कारण असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. तसेच पतीच्या आरोग्याशी संबंधित काही अडचणी होत्या का, याचाही शोध घेतला जात आहे. या दांपत्याचे लग्न होऊन सुमारे नऊ वर्षे झाली होती आणि त्यापूर्वी ते काही काळ एकत्र राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांना एक पत्रही सापडले असून त्यामधून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. संबंधित कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. कोथनूर पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.