नागपूर वनवृत्तातील ३५ वनउपज तपासणी नाक्यांवर संक्रांत

अंतर्गत भागातील नाके बंद करण्याचा निर्णय ३० एप्रिलची डेडलाईन

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
गोंदिया
gondia-check-posts आंतरराज्य सिमेवर मुख्य तपासणी नाके असल्याने सिमेच्या आत असलेले वनउपज तपासणी नाके निकामी ठरू लागले आहे. दुसरीकडे वनवृत्तात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सदर तपासणी नाके बंद करून येथील कर्मचार्‍यांचा वनक्षेत्रात रिक्त पदावर वापर केल्यास काही प्रमाणात या घटनांवर आळा घालण्यात मदत होणार आहे. तेव्हा नागपूर वनवृत्तात येणारे नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा येथील ३५ वन उपज तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय वन विभागाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, येत्या ३० एप्रिलपर्यंत हे तपासणी नाके बंद करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे.
 
check post
gondia-check-posts वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार आंतरराज्य सीमेवर आधीच मुख्य तपासणी नाके कार्यरत आहेत. तेथे वाहनांची तपासणी होत असल्याने, अंतर्गत भागात पुन्हा नाके लावून तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाचे मत आहे. अनेक नाक्यांवर कर्मचारी २४ तास ड्युटी करून दोन दिवस गैरहजर राहत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे नाकाबंदी आणि वाहन तपासणीची कामे योग्य रितीने होत नव्हती. गेल्या ३ ते ४ वर्षांत या अंतर्गत तपासणी नाक्यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाल्याची नोंदही नाही. तर दुसरीकडे नागपूर वनवृत्तात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक बीट रिक्त असल्याने, तपासणी नाक्यांवरील कर्मचार्‍यांना या रिक्त पदांवर तैनात केल्यास वन्यजीव संरक्षणास आणि संघर्ष टाळण्यास मोठी मदत होणार आहे. gondia-check-posts दरम्यान, नागपूर वनवृत्तात येणारे नागपूर वन विभागातील ९ तपासणी नाके, भंडारा ८, गोंदिया ७ व वर्धा वन विभागातील ११ असे ३५ वन उपज तपाासणी नाके बंद करण्याचा निर्णय संबंधित विभागाकडून घेण्यात आला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत सदर तपासणी नाके बंद करण्याच्या सुचना संबंधित उपवनसंरक्षक यांना देण्यात आले आहे.

हे नाके होणार बंद ...
gondia-check-posts बंद करण्यात येणार्‍या नाक्यांमध्ये नागपूर वन विभागातील बुटीबोरी, वाडी, भिवापूर, कापसी (भंडारा रोड), कोराडी, कामठी, वर्धा, काटोल रोड, दिघोरी तर भंडारा वन विभागातील निलज, कारधा, कालागोटा, गिरोला, कांद्री, लवादा, खापा, चिचोली, गोंदिया वन विभागातील परसटोला, नवेगावबांध, आमगाव, सालेकसा रोड आमगाव, कोरणी, कुडवा, फुलचूर, तर वर्धा वन विभागातील वाढोणा, रोहणा, बांगडापूर, खरांगण, तळेगाव, हेटी कुडी, रहाटी, पिलापूर, शिवनफळ, वानरचुवा, खेक हे तपासणी नाके बंद होणार आहेत.
 
gondia-check-posts तशा सुचना प्राप्त झालेल्या आहेत, मात्र, काही तपासणी नाके दुसर्‍या राज्यात जाणार्‍या अंतर्गत रस्त्यावर आहेत, तेव्हा त्या नाक्यांना सुरू ठेवणे गरजेचे आहे. याची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे.
- पवन जोंग, उपवनसंरक्षक , गोंदिया