नागपूर,
dinanath-padole : शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूरचा ६० वा वर्धापन दिन विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे उदघाटक माजी विद्यार्थी व माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा देत, “राजकारणात कार्यरत असतानाही महाविद्यालयाशी असलेली बांधिलकी कायम ठेवणार,” असा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थी व माजी आमदार दीनानाथ पडोळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शशिकांत धोकणे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे होते, तर प्रा. विकास जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
१९६७ साली स्थापन झालेल्या या संस्थेने कला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून अनेक नामांकित कलाकार, डिझायनर्स आणि शिक्षक घडविले आहेत. यानिमित्त महाविद्यालयाचा विशेष लोगो प्रकाशित करण्यात आला. तसेच वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्थेच्या परंपरेची जाणीव करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी ‘अल्यूमिनी असोसिएशन’चा लोगोही प्रकाशित करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे हा या संघटनेचा उद्देश आहे. अल्यूमिनी समितीत अध्यक्ष नंदकिशोर मानकर, उपाध्यक्ष भुलेश्वर माटे, सचिव आशिष बोदडे, कोषाध्यक्ष विजय फरकासे आणि उपसचिव डॉ. सदानंद चौधरी यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमात ‘हॉबी क्लास २०२६’ या कला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. गृहिणी व सेवानिवृत्त नागरिकांना कला जोपासण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. तसेच प्रा. प्रफुल्ल डेकाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सहा दशकांच्या समृद्ध परंपरेचा गौरव करत या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.