तलाक उच्चारताच घटस्फोट लागू!

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
प्रयागराज,
Divorce applies as soon as Talaq is pronounced अलाहाबाद उच्च न्यायालयानेमुस्लिम वैयक्तिक कायद्याशी संबंधित एका महत्त्वपूर्ण प्रकरणात स्पष्ट भूमिका मांडली आहे. न्यायालयाने नमूद केले की, पतीने ‘तलाक’ उच्चारला त्या दिवसापासूनच घटस्फोट प्रभावी मानला जातो. त्यानंतर न्यायालयाकडून दिला जाणारा आदेश हा केवळ त्या घटनेची कायदेशीर पुष्टी करणारा असतो; तो नव्याने घटस्फोट लागू करत नाही. या प्रकरणाची सुरुवात प्रयागराज येथील कौटुंबिक न्यायालयात झाली होती. एका महिलेने स्वतःसाठी आणि आपल्या दोन अल्पवयीन मुलांसाठी पोटगीची मागणी केली होती.
 
 
87987
 
मात्र, कौटुंबिक न्यायालयाने मुलांना पोटगी मंजूर केली असली तरी महिलेचा अर्ज फेटाळला. न्यायालयाने असा युक्तिवाद मांडला की, महिलेचा दुसरा विवाह वैध मानता येणार नाही, कारण पहिला विवाह त्या वेळेस कायदेशीररित्या संपलेला नव्हता.या निर्णयाविरोधात महिलेने उच्च न्यायालयात दाद मागितली. सुनावणीदरम्यान तिच्या वकिलांनी सांगितले की, तिच्या पहिल्या पतीने २७ फेब्रुवारी २००५ रोजीच तलाक दिला होता. त्यानंतर न्यायालयात प्रकरण गेले आणि २०१३ मध्ये न्यायालयाने त्या तलाकला वैध ठरवले. दरम्यान, महिलेने २०१२ मध्ये दुसरा विवाह केला होता आणि तिच्या दुसऱ्या पतीला या सर्व परिस्थितीची माहिती होती.
 
उच्च न्यायालयाने या मुद्द्याचा सखोल विचार करत कौटुंबिक न्यायालयाचा दृष्टिकोन चुकीचा ठरवला. न्यायमूर्ती मदन पाल सिंग यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाचा आदेश हा केवळ आधी झालेल्या घटनेची नोंद आणि पुष्टी असतो. त्यामुळे केवळ तांत्रिक कारणांवर आधारित महिलेला पोटगी नाकारणे योग्य ठरत नाही. न्यायालयाने हेही अधोरेखित केले की, तलाकच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित असल्यास खालच्या न्यायालयांनी पुराव्यांच्या आधारे त्याची योग्य तपासणी करणे आवश्यक आहे. अखेरीस, उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करून प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी परत पाठवले. आता महिलेच्या पोटगीच्या मागणीवर नव्याने आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.