१७८ कामांना जिल्हाधिकार्‍यांकडून हिरवी झेंडी

*पाणीटंचाई निर्मुलनासाठी ठोस पाऊल

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
वर्धा,
elimination-of-water-scarcity : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दिवसांत उद्भवणार्‍या पाणी टंचाई संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलले आहे. कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या कामांना टप्प्याटप्प्याने मंजुरी दिली जात असून आतापर्यंत नळ योजना विशेष दुरुस्तीच्या १७८ कामांना जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही कामांना मंजुरी मिळण्याची शयता वर्तविली जात आहे.
 
 
J
 
उन्हाळ्याच्या दिवसांत उद्भवणार्‍या पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी कामे वेळेत सुरू करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. पंचायत समिती स्तरावर खाजगी विहिरींच्या अधिग्रहणाच्या काही प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण आणि नवीन बोअरवेल खोदण्याचे प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने २ टप्प्यांत कृती आराखडा तयार केला आहे. सुमारे ७५७ गावांमध्ये जलसंकटाची शयता वर्तवण्यात आली आहे. या गावांत गरजेनुसार उपाययोजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये नळ योजना दुरुस्ती, नवीन कुपनलीका, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण तसेच खाजगी विहिरींचे अधिग्रहण यांचा समावेश आहे. सध्या नळ योजना दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.
 
 
निविदा प्रक्रियेनंतर कामाला सुरूवात
 
 
जिल्हाधिकार्‍यांसमोर सादर करण्यात आलेल्या १७८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. पुढील एक-दोन दिवसांत आणखी काही प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शयता आहे. त्यानंतर लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार आहे. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास संभाव्य जलसंकटग्रस्त गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.