चाकण
watermelon prices उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडाची मागणी जास्त राहणार, अशी अपेक्षा असूनही यंदा बाजारपेठेत उलटच चित्र दिसून येत आहे. फक्त महिनाभरापूर्वी २२ ते २५ रुपये प्रति किलो दराने विक्री होणारे कलिंगड सध्या केवळ ५ ते १० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे.
यंदा अनुकूल हवामानामुळे कलिंगडाचे उत्पादन भरघोस झाले आहे. मात्र, अपेक्षित मागणी न झाल्याने बाजारात पुरवठा जास्त झाला आणि दर घसरले. स्थानिक बाजारपेठांमध्ये तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक होत असल्याने दरावर दबाव वाढला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना आपला उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.कलिंगडाच्या शेतीत ‘सुपर शुगर’, ‘अरका ज्योती’, ‘किरण’, ‘शुगर बेबी’, ‘ऑगस्टा सिम्बा’ अशा विविध जातींचा समावेश असून, त्यांच्या गोडी, आकार आणि साठवण क्षमतेनुसार बाजारभाव ठरतो. मात्र यंदा सर्वच जातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने दर सर्वत्र घसरले आहेत.
महाराष्ट्रातील कलिंगड watermelon prices गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब, बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. यंदा वाहतूक खर्च वाढल्यामुळे आणि इतर राज्यांमध्ये स्थानिक उत्पादन वाढल्यामुळे परप्रांतीय मागणीत घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या संघर्षांचा परिणामही कृषी बाजारावर जाणवत आहे. निर्यात प्रक्रिया विस्कळीत झाल्याने फळांची निर्यात मर्यादित झाली असून, जास्त प्रमाणात माल स्थानिक बाजारात अडकून पडला आहे.शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढलेले इंधन दर आणि वाहतूक खर्च यामुळे आणखी भर पडली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे तरकारी आडते असोसिएशनचे पदाधिकारी सांगत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा विक्रीवर थेट परिणाम दिसून आला असून, मालाची गुणवत्ता आणि मागणी यावर परिणाम झाला आहे.
कलिंगड लागवडीसाठी watermelon prices बियाणे, खत, मजुरी आणि पाण्यावर मोठा खर्च होत असताना सध्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना गुंतवणूक परत मिळत नाही. अनेक ठिकाणी शेतकरी माल बाजारात न करता शेतातच सोडून देत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाने शासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करून हमीभाव जाहीर करण्याची, वाहतूक अनुदान देण्याची आणि निर्यात सुलभ करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, बाजारभाव स्थिर करण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, आणि त्यांचे उत्पादन वाया जाऊ शकते.