गडचिरोलीत वाढीव पाणीपुरवठा योजनेवर प्रश्‍नचिन्ह

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
गडचिरोली,
water supply scheme गडचिरोली शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर केल्याचा आरोप पुढे आला आहे. या प्रकरणी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी तसेच पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर यांनी आक्षेप नोंदवून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
 

 Gadchiroli water supply scheme issue, 
नगर परिषद गडचिरोली अंतर्गत नगर विकास विभागाच्या नगरोत्थान महाभियान योजनेतून सुमारे 133.54 कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर निविदा प्रक्रियेतून कंत्राट मंजूर होऊन कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, कामाच्या सुरुवातीपासूनच पाईपच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असल्याचे समोर आले आहे.
प्रेस नोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कंत्राटदाराने मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत बोरमाळा घाट परिसरात पाईप पुरवठा केला असून त्या पाईपचे देयकही नगर परिषदेकडे सादर करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत सादर केलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात पाईप आढळून आल्याची बाब उघड झाली आहे.तसेच पाईपची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले आहे.
या पृष्ठभूमीवर 12 मार्च 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी एकमताने पाईपची गुणवत्ता तपासण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. तसेच प्रयोगशाळेतील गुणवत्ता चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत कंत्राटदाराने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
तथापी, या निर्देशांकडे दुर्लक्ष करत कंत्राटदाराने 20 मार्चपासून मनमानी पद्धतीने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था तसेच नगर परिषदेच्या संबंधित अधिकार्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे काम सुरू करण्यात आल्याची बाबही समोर आली आहे.
यासंदर्भात पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर यांनी प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, निकृष्ट दर्जाचे पाईप वापरल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी व पाणीपुरवठ्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.
 
दरम्यान, या प्रकल्पाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू असून मलनिस्सारण गटर योजनेचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधीच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. आता जर वाढीव पाणीपुरवठा योजनेतही तशाच प्रकारची निष्कृष्टता आढळली, तर भविष्यात शहरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नगर परिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी पूर्ण करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शहरातून जोर धरत आहे.