धारणी,
korku-language : नवी दिल्ली येथे साहित्योत्सवाचे आयोजन ३० मार्च ते ४ एप्रिलपर्यंत करण्यात आलेले असून २ मार्च रोजी मेळघाटातील कोरकू बोलीभाषेचे गाढे अभ्यासक व संशोधक रामगोपाल भिलावेकर (धारणी) हे मौखिक महाकव्य विषयावरील चर्चेत भाग घेणार असहे. कोरकू भाषा थेट राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

साहित्य अकादमीच्यावतीने या साहित्योत्सवाचे आयोजन होत आहे. विविध भाषा, आदिवासींच्या परंपरागत बोली, परंपरा, भाषा विज्ञान, मौखिक व अलिखीत रुढी परंपरा, गीत - संगीत - नृत्य व विज्ञानावर आधारित कलांना जगासमोर आणण्याच्या उद्देशाने विविध चर्चासत्रे, पुस्तक प्रदर्शनी, कला प्रदर्शनीसह अनेक कार्यक्रम येथे होत आहेत. धारणी जवळच्या पाथरपूर गावातील आदिवासी तरुण रामगोपाल रामलाल भिलावेकर याने उच्च शिक्षण ग्रहण करताना व नोकरीवर असताना सुद्धा मेळघाटातील कोरकू साहित्याचा अभ्यास केलेला आहे. संस्कृतीतील वैज्ञानिक बाजुचापण शोध त्यांनी लावलेला आहे. २ एप्रिल रोजी ‘भूमि मे मूल मौखिक महाकाव्य के महत्व’ या विषयावर चर्चेत पॅनलिस्ट म्हणून रामगोपाल यांना पाचारण करण्यात आले असून ते नवी दिल्ली पोहोचले आहेत. कावेरी ऑडीटोरियममध्ये आयोजन असून इतर पॅनलिस्टमध्ये गीता (बंजारा), जितेंद्र वसावा (देहवाली), अनिल विरेंद्र कल्लू (खडिया), लक्ष्मी सबर (सोरा) यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध उद्घोषक उपेंद्र अनु करतील. रामगोपालच्या स्वरुपात थेट दिल्लीच्या राष्ट्रीय साहित्योत्सवात कोरकू संस्कृतीने आपली हजेरी लावलेली आहे.