तेहरान,
Mojtaba Khamenei is in Iran इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई जवळपास एक महिना झाले तरी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसलेले नाहीत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान रशियाचे राजदूत अलेक्सी डेडोव्ह यांनी स्पष्ट केले की, मोजतबा खामेनेई इराणमध्येच आहेत आणि विविध कारणांमुळे ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित होत नाहीत. मोजतबा खामेनेई यांनी त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनेई यांची जागा घेतली आहे. अली खामेनेई यांचा २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल हल्ल्यात मृत्यू झाला होता. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, नवीन सर्वोच्च नेते जखमी असल्याची शक्यता आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून मोजतबा खामेनेई यांना उपचारासाठी मॉस्कोला नेण्यात आले होते. रशिया आणि इराण यांचे घनिष्ठ राजनैतिक संबंध असून, गेल्या वर्षी दोन्ही देशांनी सामरिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली होती. खामेनेई याच्या अनुपस्थितीत, गेल्या महिन्यात हजारो लोकांनी आपली निष्ठा दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. जनता एकजूट दिसली तरी, नव्या नेत्याच्या सततच्या अनुपस्थितीमुळे युद्धाच्या काळात देशाचा कारभार कोण करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ५६ वर्षीय मोजतबा खामेनेई यांनी आपल्या वडिलांच्या राजवटीत पडद्याआड राहून काम केले होते. त्यांच्या प्रभावामुळे ते क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसत होते, परंतु आता सर्वात शक्तिशाली पदावर बढती मिळाल्यामुळे त्यांची सततची अनुपस्थिती महत्त्वाची ठरू शकते.