नागपूरचा चिन्मय रशियात करणार भारताचे प्रतिनिधित्व

- आयएसओ तर्फे आयोजित ‘समन्वय परिषदेत’ होणार सहभागी

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
नागपूर,
chinmay ghike शहरातील नववी इयत्तेचा विद्यार्थी चिन्मय घिके याची रशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ‘आंतरराष्ट्रीय बाल संघटनांच्या संघटने’च्या (आयएसओ) वतीने आयोजित ‘समन्वय परिषदेत’ सहभागी होण्यासाठी तो दिनांक १३ ते १७ एप्रिल दरम्यान स्मोलेंस्क, रशिया येथे जाणार आहे. विशेष म्हणजे, भारतातून निवडलेल्या केवळ दोन विद्यार्थ्यांमध्ये चिन्मयचा समावेश आहे.

chinmay ghike 
 
 
या निवडीसाठी विद्यार्थ्यांना ‘लोगो’ तयार करून सादर करणे तसेच संघटनेच्या जागतिक मैत्री, युवा सहकार्य आणि मुत्सद्देगिरीवरील दृष्टिकोन मांडणारे ‘ब्रँड बुक’ तयार करणे आवश्यक होते. चिन्मयने सादर केलेल्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मांडणीमुळे त्याची निवड झाली. तो सोमलवार स्कूल, निकलासचा विद्यार्थी असून, त्याला प्रभारी शिक्षिका चेतना ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
ही संधी ‘ब्रिक्स युथ अलायन्स’च्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय शालेय मुत्सद्देगिरी प्रकल्पा’तून उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पासाठी संपूर्ण भारतातून निवडलेल्या केवळ १२ शाळांमध्ये सोमलवार स्कूलचा समावेश आहे.
रशियातील परिषदेत २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ‘ब्रँड बुक’ विकसित करण्यावरही भर दिला जाईल.chinmay ghike या कार्यक्रमाचा सर्व खर्च आयोजकांकडून करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
सोमलवार अकॅडमीचे सचिव प्रकाश सोमलवार यांनी चिन्मयचे अभिनंदन केले, तर प्राचार्य दामोदर थोंबरे यांनी त्याला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. चिन्मयची ही कामगिरी नागपूरसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.