नागपूर,
national-youth-festival : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या ३९ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात उत्कृष्ट प्रदर्शन करत ललित कला प्रकारात उपविजेता चषक पटकाविला आहे. चेन्नई येथील सत्यभामा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था येथे दिनांक १० ते १४ मार्चदरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकिक वाढविला.
या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते दीक्षांत सभागृहात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी “कला-कौशल्य सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. पोस्टर स्पर्धेत वेदांत खासबागे, रांगोळीमध्ये सायली गडकरी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. सर्जनशील नृत्य गटाने द्वितीय, तर लघुनाट्य (स्किट) आणि शास्त्रीय गायन स्पर्धांमध्ये तृतीय पुरस्कार पटकावले. वादविवाद आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.
या यशामागे संघ व्यवस्थापक प्रकाश शुक्ला, डॉ. संयुक्ता थोरात तसेच प्रशिक्षक स्वप्निल खरे, नितीन मरसकोल्हे आणि जय गाला यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय मध्य क्षेत्रीय आणि ‘इंद्रधनुष्य’ आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्येही विद्यापीठाने अनेक पुरस्कार मिळवत आपली कला क्षमता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनत, समर्पण आणि सर्जनशीलतेमुळे मिळालेल्या या यशाने केवळ विद्यापीठच नव्हे, तर नागपूर परिसरालाही अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.