नवसारी क्रीडा संकुल अधिकृतपणे मनपाच्या ताब्यात

-शासनाने जागा दिली विनामूल्य -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
navsari-sports-complex : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमरावतीलगतच्या नवसारी येथील १६,७०८ चौ. मी. जागेवर विकसीत झालेल्या क्रीडा संकुलाची जागा अमरावती महानगरपालिकेला विनामूल्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाला.
 
 
K
 
 
 
सदर जागेवर विकास योजनेअंतर्गत ’खेळाचे मैदान’ असे आरक्षण होते आणि त्याचा आगाऊ ताबा महापालिकेला देण्यात आला होता. मात्र, महापालिकेने या जागेवर पूर्वपरवानगीशिवाय त्रयस्थांसोबत करार करून क्रीडा संकुल विकसित केले आणि काही क्षेत्रावर (१८७८.८० चौ.मी.) वाणिज्य वापर सुरू केला होता. या शर्तभंगामुळे शासनाच्या नियमांनुसार या जागेचे अकृषिक दराने होणारे मूल्यांकन १० कोटी ९० लाख १९ हजार ७०० रुपये आणि २०११ पासूनच्या वाणिज्य वापरापोटीचे व्याज ३ कोटी ५६ लाख २१ हजार ८६२ रुपये, अशी एकूण १४ कोटी ४६ लाख ४१ हजार ५६२ रुपयांची रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.
 
 
परंतु, अमरावती महानगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती बेताची आहे. कर्मचार्‍यांची देणी व कंत्राटदारांची थकीत देयके असे जवळपास ३५० कोटींचे दायित्व महापालिकेवर आहे. महापालिकेच्या स्वउत्पन्नातून एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याचे महापालिका आयुक्तांनी शासनाला कळवले होते. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पाठपुरावा करुन पालिकेसाठी हे संकुल उपलब्ध करुन देण्याचा मार्ग मोकळा करुन दिला.
 
खेळाडूंच्या हितासाठी दिली जागा
 
 
अमरावती शहरासाठी क्रीडांगण ही आवश्यक बाब होती. या ठिकाणी तयार झालेले अनेक खेळाडू देश आणि जगभरात लौकिक मिळवत आहेत. त्यामुळे सामाजिक हित आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन या क्रीडांगणासाठी शासकीय जागा महापालिकेस विनामूल्य देण्यात येत आहे.
-चंद्रशेखर बावनकुळे
महसूलमंत्री व पालकमंत्री, अमरावती