प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडवण्यासाठी ‘पूजा’

गटनेता डॉ. नीरज वाघमारे यांचे अनोखे आंदोलन

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
neeraj-waghmare : यवतमाळ नगर परिषदेची करोडो रुपयांची ‘रोड व्हॅक्युम स्वीपर मशीन’ धूळ खात पडली आहे. या मशीनद्वारे शहरातील रस्ते स्वच्छ होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी गटनेता तथा नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी पूजाअर्चा करून अनोखे आंदोलन केले.
 
 
y1Apr-Neeraj
 
नगर परिषद प्रशासनाने या मशीनच्या माध्यमातून शहरातले रस्ते स्वच्छ व्हावेत, या दृष्टीने वाहन खरेदी केले असले तरी प्रभाग स्वच्छ करण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून वाहन उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे नप प्रशासन एकप्रकारे कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे हे वाहन इतर निरुपयोगी वाहनांच्या ताफ्यात धूळ खात पडलेले आहे, याचा कुठेही उपयोग होत नाही.
त्यामुळे नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी प्रतीकात्मक यज्ञ व पूजाअर्चा पुरोहिताच्या हस्ते केली. त्यामुळे आतातरी नगर परिषद प्रशासन जागे होईल या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या वाहनासमोरच पूजाअर्चा व यज्ञ करून हनुमान जयंतीच्या निमित्ताने साकडे घालून नगर परिषदेची तक्रार हनुमानजींकडे करण्यात आली.
 
 
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव संजय इंगळे, शहराध्यक्ष प्रसन्नजीत भवरे, शहर महासचिव प्रमोद पाटील, नितेश पाटील, शैलेश भानवे, देवानंद लोणारे, केशव भागवत, गजानन कोकाटे, उत्तम कांबळे, रामदास वीर, अरविंद दिवे, केशव भागवत, संजय तेलतुंबडे हे कार्यकर्ते उपस्थित होते.