इंधनटंचाईमुळे पाकिस्तानचे परदेशी उड्डाणांवर निर्बंध

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Pakistan bans foreign flights जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये इंधनटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम विमान वाहतुकीवर झाला आहे. आता पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने परदेशी विमान कंपन्यांसाठी विशेष निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांनुसार, पाकिस्तानमध्ये येणाऱ्या परदेशी विमानांनी येताना आणि परत जाताना आवश्यक तेवढे इंधन स्वतःसोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर इंधन भरण्याची सुविधा मर्यादित करण्यात आली आहे.
 
 

foreign flights 
 
माहितीनुसार, इंधन पुरवठा साखळीमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावामुळे तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा फटका दक्षिण आशियातील देशांना बसत आहे. परिणामी, पाकिस्तानमध्ये विमान इंधनाचा तुटवडा जाणवत आहे.या संदर्भात जारी करण्यात आलेल्या सूचनेत परदेशी विमान कंपन्यांना शक्य तितके इंधन बाहेरूनच भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून स्थानिक साठ्यावरचा ताण कमी होईल. हा नियम मात्र देशांतर्गत विमान कंपन्यांना लागू होणार नसून, त्यांना आवश्यकतेनुसार इंधन पुरवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, जागतिक बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने त्याचा परिणाम इतर देशांवरही दिसून येत आहे. भारतातही विमान इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली असून, त्यामुळे विमानप्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत विमान इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढून विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. या संपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर दबाव वाढला असून, पुढील काही दिवसांत प्रवास खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.