तळेगाव (श्या. पं.),
house-burglary-case : रामदरा येथील मंगेश निळकंठ ठाकरे यांच्या घरात १८ मार्च रोजी पहाटे ३.२५ ते ५.२५ दरम्यान झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तळेगाव पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी नागपूर येथील सराईत आरोपीस काही दिवसाआधी अटक करण्यात आली होती. यातील दोन साथीदार अद्याप फरार होते. त्यापैकी अरहांत उर्फ गोल्डी गजबीये (२१) रा. बिनाकी बौद्ध विहार, इतवारा नागपूर याला तळेगाव पोलिसांनी अटक केली. त्यामुळे आरोपींची संख्या दोन झाली असून तिसर्या आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील तसेच विविध टोल नायांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली होती. यामध्ये कारंजा घाडगे, गौंडखरी आणि नांदगाव पेठ येथील टोल नायांवर संशयित चारचाकी वाहनांच्या हालचाली आढळून आल्या होत्या. याआधारे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. या तपासात स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावत नागपूर येथील रेकॉर्डवरील आरोपी असलम अब्दुल शरीफ खान (२३) रा. हमीदनगर, नागपूर याला अटक केली. २१ मार्च रोजी चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीचा गुन्हा कबूल केला होता.
या प्रकरणातील तीन आरोपींपैकी आणखी अरहांत उर्फ गोल्डी गजबीये याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.