वर्धा,
wardha surgery two month baby बेवारस श्वानांच्या भांडणात गंभीर जखमी झालेल्या अवघ्या २ महिन्यांच्या पिलावर वर्धेतील डॉग लिनिकमध्ये अत्यंत जटिल व जीवघेणी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. सदर श्वानाचे पिल्लू हे बेवारस असून त्याला जखमी अवस्थेत समीक्षा राऊत यांनी उपचाराकरिता वर्धेतील डॉग लिनिक येथे हलविले. या घटनेत पिलाचा छाती व पोट यांना विभक्त करणारा महत्त्वाचा पडदा (डायाफ्राम) फाटला होता. या अवस्थेला ट्रॉमॅटिक डायाफ्रामॅटिक हर्निया असे म्हणतात.
या गंभीर दुखापतीमुळे पिलाच्या पोटातील अवयव छातीच्या पोकळीत सरकले होते, ज्यामुळे फुफ्फुसांवर दाब येऊन श्वास घेण्यास अत्यंत त्रास होत होता. पिलाचे एसपीओ-२ केवळ ६२ इतके धोकादायकरित्या कमी होते. पिलाची स्थिती लक्षात घेता तातडीने कृत्रिम श्वसन (व्हेंटिलेटर सपोर्ट) देण्यात आले. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत भूल देणे, श्वसन नियंत्रणात ठेवणे आणि फुफ्फुसांना योग्य प्रमाणात कृत्रिम श्वास देणे हे अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जोखमीचे असते. विशेषतः इतया लहान वयाच्या पिलावर ही प्रक्रिया करणे ही मोठी वैद्यकीय आव्हानात्मक बाब होती. शस्त्रक्रियेदरम्यान छातीमध्ये गेलेले अवयव काळजीपूर्वक त्यांच्या मूळ स्थितीत आणण्यात आले आणि फाटलेला डायाफ्राम शस्त्रक्रियेद्वारे व्यवस्थित शिवण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पिलाच्या श्वसनावर सतत नियंत्रण ठेवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर पिलाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली असून त्याचे एसपीओ-२ हे ८५ पर्यंत वाढले आहे. सध्या पिलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
ही दुर्मिळ व अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया वर्धेतील डॉग लिनिकमध्ये डॉ. संदीप जोगे व त्यांच्या कुशल सहकार्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.wardha surgery two month baby या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. उपाध्ये, डॉ. पियुष दुबे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. विदर्भात अशा प्रकारच्या ट्रॉमॅटिक डायाफ्रामॅटिक हर्नियाच्या शस्त्रक्रिया अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने ही यशस्वी शस्त्रक्रिया वर्धा जिल्ह्यासाठी आणि पशुवैद्यकीय क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण व अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे. या यशामुळे भविष्यात अशा गंभीर प्रकरणांवर उपचार करण्यासाठी स्थानिक स्तरावर आत्मविश्वास वाढणार आहे.
या शस्त्रक्रियेमुळे एका निराधार पिलाला नवजीवन मिळाले असून, प्राण्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे आणि अत्याधुनिक वैद्यकीय कौशल्याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.