तभा वृत्तसेवा
राळेगाव,
hanuman-janmotsav : हनुमान जन्मोत्सवानिमित्त राळेगाव शहरातील दारूविक्री पूर्णत: बंद ठेवण्याबाबत व अवैध दारूविक्रीवर कारवाई करण्याबाबत राळेगाव शहरातील महाकाल ग्रुपतर्फे बुधवार, 1 एप्रिल रोजी राळेगाव उपविभागीय अधिकाèयांना निवेदन देण्यात आले.
शहरात दरवर्षीप्रमाणे हनुमान जन्मोत्सव हा पवित्र धार्मिक सण मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने गुरुवार, 2 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, मिरवणुका तसेच सामुदायिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भाविक व नागरिक सहभागी होतात.
मात्र, काही वेळा मद्यप्राशनामुळे समाजात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होते, ज्यामुळे धार्मिक वातावरणाला गालबोट लागू शकते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हनुमान जन्मोत्सवासारख्या पवित्र व धार्मिक सणाच्या दिवशी शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक भावना अबाधित राहणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच, राळेगाव शहरातील मुलींच्या वसतिगृहाजवळ सुरू असलेले देशी दारूचे एक अवैध दुकान तत्काळ बंद करण्यात यावे. यामुळे परिसरातील महिला व नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
याचप्रमाणे, शांतीनगर परिसरातील घरगुती देशी दारूविक्रीचे अवैध दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशीही ठाम महाकाल ग्रुपने केली आहे. अशा अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे.
त्या अनुषंगाने हनुमान जन्मोत्सवदिनी राळेगाव शहर व परिसरातील सर्व देशी-विदेशी दारूविक्रीची दुकाने, बार व मद्य वितरण केंद्रे पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच वर नमूद केलेल्या अवैध दारूविक्री केंद्रांवर तत्काळ व कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी. यामुळे सण शांततेत, सुरक्षिततेत व उत्साहात पार पडण्यास मदत होईल, अशा मागणीचे निवेदन शहरातील महाकाल ग्रुपने उपविभागीय अधिकाèयांना दिले.