तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
sanjay-rathod-parag-pingle : महाराष्ट्रातील राजकीय पटलावर आपली पकड अधिक भक्कम करण्यासाठी शिवसेना पक्ष मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात संघटन विस्ताराचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि बदलते राजकीय समीकरण लक्षात घेऊन राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी विविध स्तरांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या निर्णयांतर्गत पश्चिम विदर्भ विभागीय संपर्क प्रमुखपदी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची आणि विभागीय सहसंपर्क प्रमुखपदी पराग पिंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेने संघटन अधिक बळकट करण्यासाठी राज्याचे विविध विभागांत विभाजन केले असून, पश्चिम विदर्भ विभागात यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, कार्यकर्त्यांशी थेट संवाद वाढवणे आणि संघटन मजबूत करणे या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
पक्षाच्या अधिकृत निवेदनानुसार, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ही नवी संघटनात्मक फळी उभारण्यात आली आहे. ‘कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा’ या ब्रीदाखाली प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा पक्षाचा मानस असून, स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व तयार करणे आणि जनतेच्या प्रश्नांवर तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा उभी करणे हा या नियुक्त्यांमागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मंत्री संजय राठोड यांचा प्रशासकीय अनुभव आणि विदर्भातील जनसंपर्क लक्षात घेता पक्षविस्ताराला गती मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे पराग पिंगळे यांचे संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळे पक्षांतर्गत समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे.
या नियुक्त्यांमुळे पश्चिम विदर्भातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही संघटनात्मक मोर्चेबांधणी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.