नृत्यातून जमा केला 16 लाखांचा निधी

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
आलापल्ली,
Srikant Katelwar कोणत्याही दुर्गम भागात जर प्रबळ इच्छाशक्ती आणि समाजभान असेल, तर तिथल्या शाळांचे नंदनवन कसे करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षक श्रीकांत गटय्या काटेलवार. गडचिरोली आणि नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शाळांना अक्षरशः ‘नवसंजीवनी’ देणार्‍या या धडपड्या गुरुजींचा नुकताच पुण्यातील एका दिमाखदार सोहळ्यात राज्यस्तरीय गौरव करण्यात आला.
 

Srikant Katelwar  
रविवार, 29 मार्च रोजी पुण्यातील प्रसिद्ध ‘ग. दि. माडगूळकर सभागृहात’ हा दिमाखदार सोहळा पार पडला. शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व दत्तात्रय वारे गुरुजी आणि इतर नामवंत मान्यवरांच्या हस्ते काटेलवार यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गेल्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत काटेलवार यांनी तब्बल 4 जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, भौगोलिक अडचणी आणि संसाधनांची कमतरता असतानाही त्यांनी जिद्दीने शाळांचा विकास केला. केवळ सरकारी मदतीवर विसंबून न राहता त्यांनी लोकसहभाग आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळांना आधुनिक रूप मिळवून दिले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे.
 
श्रीकांत काटेलवार यांचा सर्वात मोठा आणि नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना त्यांनी थेट शाळेच्या विकासाशी जोडले. नृत्याच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी चक्क 16 लाख रुपयांचा निधी उभा केला. या पैशांचा विनियोग करून त्यांनी राज्यातील अतिशय दुर्गम भागात अद्ययावत ‘डिजिटल शाळा’ उभारण्याची किमया साधली. त्यांच्या या अभिनव प्रयोगाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
दुर्गम आणि आदिवासी भागात विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवणे आणि गळती थांबवणे हे मोठे आव्हान असते. मात्र, नवनवीन शैक्षणिक प्रयोग राबवून काटेलवार यांनी मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. त्यांनी परिसरात शिक्षणाबद्दल अत्यंत सकारात्मक आणि उत्साही वातावरण तयार केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावरही घेतली जात असून, त्यांनी अनेक राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग नोंदवला आहे.
 
काटेलवार सरांच्या या बहुमानामुळे गडचिरोली आणि नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विधानसभेत कौतुक आणि शासनाकडून डॉक्युमेंटरी!
काटेलवार यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या ‘वाळवी’ येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमांची दखल थेट महाराष्ट्र विधानसभेत घेण्यात आली होती. दुर्गम भागातील एका प्राथमिक शाळेने गाठलेले हे प्रगतीचे शिखर पाहून सभागृहानेही या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्र शासनाने या शाळेच्या यशावर आधारित एका विशेष व्हिडिओ डॉक्युमेंटरीची (माहितीपट) निर्मिती देखील केली आहे.