धान पट्ट्यात आंबा लागवडीचा यशस्वी प्रयोग

४४ शेतकऱ्यांनी केली ११.५० हेक्टरमध्ये लागवड, साडेतीन वर्षांनंतर फळाला आली मेहनत

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
लहान शेतीतून मोठे यश : भंडारा जिल्ह्यामध्ये समूह पद्धतीने फळबाग लागवडीचा पथदर्शी प्रकल्प
संदीप नंदनवार
नागपूर, 
Successful experiment of mango शेती परवड नाही म्हणून रोजगारासाठी नागपूर सारख्या शहरात मोलमजुरी व सेंट्रीगचे काम करायला गेलेल्या अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कोरोना काळात लॉकडाऊनमुळे गावाकडे परतावे लागले. आता अर्ध्या एकर शेतात काय पिकवू व कुटुंबाचा उदरर्निवाह कसा करू असा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. मात्र, अशा परिस्थितीतही कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, आंतरपीक पद्धत, योग्य नियोजन व कृषी योजनांचा लाभ घेत लाखनी तालुक्यातील मुंडीपार येथील अत्यल्प भूधारक ४४ शेतकऱ्यांनी धान पट्ट्यात समूह पद्धतीने आंबा फळबाग लागवडीचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी करून दाखविला आहे.

Successful experiment of mango
अल्पभूधारक असल्यामुळे आर्थिक कचाट्यात सापडलेले हे शेतकरीही परंपरागत भात शेतीला फाटा देऊन व त्या ऐवजी फळ शेतीवर भर देऊन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ शकतात, याचे अनुकरणीय उदाहरण भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जगासमोर ठेवले आहे. Successful experiment of mango पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांनी भात शेतीला फाटा देत कृषी विभागाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सलग व घनदाट पद्धतीने समूह (क्लस्टर ) स्वरूपात आंबा फळबागांची लागवड केलेली आहे. लाखनी तालुक्यातील हा प्रयोग भंडारा जिल्ह्यामध्ये समूह पद्धतीने फळबाग लागवडीचा पथदर्शी प्रकल्प ठरला आहे.
सन २०२२-२३ ते २०२५-२६ दरम्यान लाखनी तालुक्यातील मुंडीपार, सिंदीपर, मोरगांव, परसोडी, राजेगाव या गावातील एकूण ४४ शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतावर ११.५० हेक्टर क्षेत्रावर आंबा फळबागाची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने केसर, दसेरी, लंगडा या वाणाचा समावेश आहे. Successful experiment of mango विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी ह्या बागांची लागवड सघन व अति सघन पद्धतीने केली आहे. मुंडीपार (सिंदीपार)येथील चंद्रशेखर टेंभुर्णे या फक्त अर्धा एकर जमीनधारणा असलेल्या या अत्यल्प भूधारक शेतकऱ्याची फळबाग लागवड इतरांना विशेष प्रेरणा देणारी ठरली. आज साडेतीन वर्षानंतर या बागेतील आंब्याच्या झाडांना फळधारणा झालेली आहे.
कोरोनाने मारले शेतीने तारले
अर्ध्या एकर शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नसल्याने चंद्रशेखर टेंभुर्णे तसेच संदेश पंधरे, नरेश बावणे व इतरही शेतकरी शेती परवडत नाही म्हणून रोजगारासाठी नागपूरला गेले. परंतु सन २०२१-२२ मध्ये कोरोनाच्या टाळेबंदीमुळे त्यांना रोजगार सोडून गावी परतावे लागले. Successful experiment of mango  अशा परिस्थितीत चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे शेतीमध्ये काही करण्याची इच्छा बोलून दाखवली. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांचे मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार, मुंडीपार व चिचटोला या गावी क्षेत्रीय भेट देऊन पपई, आंबा, पेरू ,केळी ,ड्रॅगन फ्रुट व भाजीपाला पिकांची विकसित शेती बघितली. त्यामधून या शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याची प्रेरणा मिळाली व आंबा फळबाग लागवड करण्याचे निश्चित केले.
एमआरईजीएस व प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा घेतला लाभ
भंडारा जिल्ह्यामध्ये जास्त पर्जन्यमान असल्यामुळे व भातखाचरात साचलेले पाणी फळपीक पिकाकरिता हानिकारक असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना इजरायल पद्धतीने उंच वरंबा सरी पद्धतीने बेडवर लागवड करून ठिबक सिंचन लावण्यास तत्कालीन तालुका कृषी अधिकारी पात्रीकर यांनी प्रेरित केले. शेतकऱ्यांना लागवडीकरिता मुख्यत्वे करून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) व तसेव ठिबक सिंचनाकरिता प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यात आला. Successful experiment of mango काही शेतकऱ्यांनी घन लागवड म्हणजे पाच मीटर बाय पाच मीटर अंतरावर लागवड करून एक एकरला १६० झाडे लावली तर काही शेतकऱ्यांनी पाच मीटर बाय अडीच मीटर या अंतरावर अति घन लागवड करून एक एकरला ३२० झाडे लावली.
गरज म्हणून स्वीकारले तंत्रज्ञान
कृषी विस्ताराचे शास्त्रीय अभ्यासाप्रमाणे तंत्रज्ञान अवलंब रेषा (Technology Adoption Curve) नुसार सुरुवातीला नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांचे प्रमाण हे फक्त २.५ टक्के एवढे असते. परंतु या प्रकल्पामध्ये सुरुवातीला तंत्रज्ञान स्वीकारणारे शेतकरी हे अत्यल्प साधन सामग्री असणारे व गावाच्या आर्थिक स्थितीचे सर्वसाधारण प्रतिनिधित्व करणारे व गरज म्हणून तंत्रज्ञान स्वीकारणारे होते. Successful experiment of mango त्या कारणाने या तंत्रज्ञानाचा स्वीकार एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे जलद गतीने झाला. सुरुवातीच्या काळातील तंत्रज्ञान स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण हे सर्वसाधारण टक्केवारी पेक्षा अधिक आढळून आले. याचा अनुभव उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी एका प्रशिक्षणा दरम्यान राज्याचे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग यांच्याशी चर्चेदरम्यान कथन केला.
थेट प्रश्न - चंद्रशेखर टेंभुर्णे अत्यल्प भूधारक शेतकरी, मुंडीपार ता. लाखनी
 
 
प्र. १. किती एकरात किती झाडे लावली?
उ. अर्ध्या एकर क्षेत्रात २३५ मुख्यत्वे करून केसर कलमांची लागवड केली


प्र. २. किती खर्च आला?
उ. लागवड व फळबागेचे व्यवस्थापनाकरिता आतापर्यंत ५५ ते ६० हजार खर्च आला.


प्र. ३. खर्चाची भरपाई कुठून व कशी काढली?
उ. ९० टक्के खर्चाची भरपाई ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (एमआरईजीएस) मिळाली


प्र. ४. फळबागेचे उत्पादन साडेतीन ते चार वर्षानंतर येणार असल्यामुळे या काळात नेमके केले काय?
उ. वर्षभरात कारली, चवळी, दोडका, कांदे, मुळा, झेंडूचे फुलपीक इत्यादी पिकांची मधल्या जागेत आंतरपीक म्हणून ठिबक सिंचनाद्वारे सरीवरंबा पद्धतीने लागवड करून वर्षभरात ७० ते ८० हजार एवढे निव्वळ उत्पन्न मिळविले.


प्र. ५ आंबा लागवडीपासून अपेक्षीत उत्पन्न किती मिळेल?
उ. प्रथम वर्षी एका झाडापासून सरासरी पाच किलो उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे २०० झाडांपासून मिळणाऱ्या एक टन उत्पन्नापासून निश्चितपणे ८० हजार उत्पन्न मिळेल जे की निवळ नफा असेल.
भात उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक सुबकता वाढवून जीवनमान उंचावण्याकरिता पर्यायाने फलोत्पादनाकडे वळावे लागेल. भाजीपाला शेतीमध्ये मजुरांची टंचाई लक्षात घेता फळ पिकांची इजरायल पद्धतीने उंच वरंबा सरी व ठिबक सिंचनावर आंबा , पेरू या पिकांची घनदाट पद्धतीने लागवड हा योग्य पर्याय ठरू शकेल. तसेच केळी व बोर या पिकांचे लागवडी सुद्धा वाव आहे.
- किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषी अधिकारी , साकोली.