केवळ 15 टक्के झाडेच झाली काँक्रीटमुक्त

- हायकाेर्टात मनपाचा प्रगती अहवाल सादर

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
trees-are-concrete-free : उपराजधानीतील झाडांच्या भाेवती टाकण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या आळ्यांबाबत चिंताजनक चित्र समाेर आले आहे. शहरातील एकूण 3691 झाडे काँक्रीटमध्ये अडकलेली आढळून आली असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ 567 झाडांनाच काँक्रीटमुक्त करण्यात यश आले आहे. म्हणजेच फक्त सुमारे 15 टक्के झाडांचीच सिमेंटीकरणातून मुक्तता झाली आहे. ही माहिती मनपाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रगती अहवालातून समाेर आली.
 
 
K
 
 
शहरातील झाडांच्या भाेवती टाकण्यात आलेले सिमेंट-काँक्रीटचे आळे काढणे तसेच विकास कामांच्या नावाखाली हाेणारी झाडांची माेठ्या प्रमाणावरील कत्तल थांबविण्याबाबत प्रलंबित जनहित याचिकांवर न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्यायमूर्ती राज वाकाेडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
 
 
2018 मध्ये उच्च न्यायालाने स्वत:हून दखल घेत शहरातील झाडांच्या अंधाधुंद ताेडीविराेधात जनहित याचिका दाखल केली हाेती. याशिवाय पर्यावरण तज्ज्ञ शरद पाटील आणि इतर तिघांनी शहरातील सर्व झाडे काँक्रीटमुक्त करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे.
 
 
मागील सुनावणीवेळी मनपाच्या उद्यान विभागाच्या उपायुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करून आतापर्यंतच्या कामाचा तपशील दिला हाेता. त्यानुसार, शहरातील 3691 झाडांभाेवती काँक्रीटचे घेर असल्याचे निदर्शनास आले असून, यापैकी 3360 झाडे मनपा हद्दीत येतात. या झाडांभाेवतीचे काँक्रीट काढण्यासाठी सुमारे 45 ते 50 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे मनपाने सांगितले आहे. तसेच, इतर प्राधिकरणांच्या अखत्यारीतील झाडांबाबत संबंधित विभागांना पत्र पाठवण्यात आले आहे. यापूर्वी न्यायालयाने झाडांभाेवतीचे काँक्रीट काढण्याची जबाबदारी मनपावर साेपवली असून, खर्च संबंधित प्राधिकरणांनी उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबराेबर नियमित प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले हाेते.
 
 
प्राधिकरणनिहाय काँक्रीटमधील झाडांची संख्या :
 
मनपा : 3360
पीडब्ल्यूडी : 170
एनएचएआय : 28
एनआयटी : 22
पीडब्ल्यूडी : 76
पीडब्ल्यूडी : 35
एकूण : 3691
 
 
गांधीबाग झाेन आघाडीवर
 
 
शहरात सर्वाधिक काम गांधीबाग झाेनमध्ये करण्यात आले असून, तेथे 205 झाडांना काँक्रीटमुक्त करण्यात आले आहे. याशिवाय नेहरू नगर झाेनमध्ये 150, धरमपेठ झाेनमध्ये 112, मंगळवार झाेनमध्ये 60 तर हनुमान नगर झाेनमध्ये 40 झाडांभाेवतीचे काँक्रीट काढण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण 567 झाडे काँक्रीटच्या जाळ्यातून मुक्त करण्यात आली आहेत.