तुमसर,
tunmsar news अंगणात खेळत असताना गायब झालेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्याच्या डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या रोंगा गावात घडली. आज 1 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या घटनेत चंदपाल रुपचंद कुंभरे,.वय ७ वर्ष आणि सार्थक संजय उईके, वय ६ वर्ष या दोघांचा जीव गेला. घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
रोंगा येथील चंदपाल रुपचंद कुंभरे आणि सार्थक संजय उईके हे दोघे मंगळवार, ३१ मार्च रोजी संध्याकाळी सुमारे चार वाजेपर्यंत आपल्या घरासमोर अंगणात खेळत होते. त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. बराच वेळ लोटल्यानंतरही दोघे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत गाव परिसर, शेतजमिनी आणि आसपासच्या भागात शोधमोहीम राबविली, मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली होती. दरम्यान, बुधवार, १ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास गावा जवळील एका पाण्याच्या डबक्यात दोन लहान मुलांचे मृतदेह तरंगताना काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ही माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी हे ऐकून घटनास्थळी गर्दी केली. नंतर या मृतदेहांची ओळख चंदपाल कुंभरे आणि सार्थक उईके अशी पटली.
ही बातमी समजताच दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. संपूर्ण गावात शोकमय वातावरण आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही घटना अपघाती बुडण्याची असण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.tunmsar news या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.