मालेगावला अवकाळीचा तडाखा

वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
मालेगाव,
unseasonal rain मालेगाव शहरात एप्रिल महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली असून, सुमारे एका तासाच्या मुसळधार पावसाने मोठा तडाखा दिला. जोरदार वादळी वार्‍यासह गडगडाटी पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
 

 unseasonal rain Malegaon 
बुधवार, १ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला. आकाशात काळे ढग दाटून आले आणि वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस एक तासाहून अधिक काळ सुरू राहिल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसला आहे. शेतात तयार असलेली हळद व कांद्याची रोपे तसेच कापणीनंतर शेतातच ठेवलेला गहू यांचे नुकसान होण्याची शयता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे पिके आधीच बाधित झाली होती. त्यात या नव्या पावसामुळे शेतकर्‍यांची चिंता आणखी वाढली आहे.
 
 
पावसासोबत आलेल्या जोरदार वार्‍यांमुळे बाजारात आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला, तर काही ठिकाणी धावपळीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.