unseasonal rain तालुक्यात सोमवार, ३० मार्च रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात झालेल्या या बदलत्या हवामानामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, तर शेतकर्यांची अक्षरशः धावपळ उडाली. विशेषतः उशिरा पेरणी केलेल्या गहू, हरभरा, भाजीपाला,हळद आणि हंगामी पिकांना या पावसाचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
अवकाळी पावसाचे हे चित्र नवीन नाही. दरवर्षी हंगामाच्या निर्णायक टप्प्यावर निसर्गाचा असा अनपेक्षित कोप शेतकर्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवतो. यावेळीही नेमया कापणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांना पावसाने झोडपल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वादळी वार्यामुळे पिके आडवी झाल्याचे, तर काही ठिकाणी भाजीपाला पूर्णतः खराब झाल्याच्या घटना समोर येत आहेत. शेतकरी आधीच उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना, अशा अवकाळी पावसामुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. आम्ही वर्षभर मेहनत करतो, पण शेवटच्या टप्प्यावर निसर्गच साथ देत नाही अशी व्यथा अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना त्वरित आर्थिक मदत देणे, पीकविमा योजना प्रभावीपणे राबवणे आणि हवामान अंदाजाची अचूक व वेळेवर माहिती पोहोचवणे, ही काळाची गरज बनली आहे. हवामान बदलाचे वाढते परिणाम आता ग्रामीण भागात अधिक स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. अनियमित पाऊस, वाढती उष्णता आणि वादळी वार्यांचे प्रमाण वाढत असल्याने शेती व्यवसाय अधिक जोखमीचा बनत चालला आहे. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजनांच्या दिशेने शासनाने गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे. एकूणच या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकर्यांच्या असुरक्षिततेची जाणीव करून दिली आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन, शासन आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे. पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकर्यांनी याची धास्ती घेतली आहे. वादळी वार्यामुळे बत्ती गुल झाल्याने काही ठिकाणी काही तास तर काही ठिकाणी संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली.