वर्धा,
Varud Hindu Sammelan सनातन संस्कृती, सनातन धर्म आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने वरूड येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन शनिवार २९ रोजी करण्यात आले होते. सेवाग्राम रोड, धन्वंतरी नगरी सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात पार पडलेल्या या सोहळ्याला हजारो हिंदू बांधवांनी उपस्थित राहून हिंदू एकतेचा निर्धार व्यत केला.
यावेळी ग्रामगीता अभ्यासक सुरेंद्र बेलूरकर, अमरावती येथील शारीरिक विभाग प्रमुख सचिन मुळे, नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख उपस्थित होते.सायंकाळी ६ वाजता कलशयात्रा आणि वरूड गावातून उत्साही मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये अबालवृद्धांसह हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते. सायंकाळी ६ वाजता धर्मध्वजारोहण, गोमाता पूजन आणि कन्या पूजन करण्यात आले. सुरेंद्र बेलूरकर यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी संघटित होण्याचे आवाहन केले.
सचिन मुळे यांनी आशीर्वचनात, हिंदू समाजाने आपली संस्कृती जपण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे सांगितले. तर नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांनी संघटनात्मक कार्याचे महत्त्व अधोरेखित करीत प्रत्येक गावात अशा संमेलनांचे आयोजन व्हावे आणि हिंदूंनी स्वाभिमानाने जागे होऊन स्वयंसेवक बनावे, असे मत त्यांनी व्यत केले.सायंकाळी ७ वाजता भारतमाता आरती आणि भजन संगीताने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. रात्री ७.३० वाजता महाप्रसाद वितरणाने या संमेलनाचा समारोप झाला.
यावेळी सांघिक गीत संजय नाईक तर प्रास्ताविक हरीश गांधी यांनी केले. संचालन आणि आभार प्रदर्शन प्रफुल्ल गर्गे यांनी केले. यशस्वीतेसाठी रमेश घडिया, रामदास जामुनकर, गणेश नासरे, सुभाष देशमुख, रामदास नवघरे, हरीश त्रिवेदी, दीपक शिंदे, प्रशांत कलोडे, विष्णू रानडे यांनी सहकार्य केले.