तिवसा,
youth-on-bike-dies : तालुक्यातील सार्सी ते तिवसा मार्गावर घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, दोन दिवसांनी त्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंकुश पांडुरंग अमझरे (वय २७, रा. टाकरखेड पुर्णा) असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अंकुश अमझरे हा आपल्या जावयाकडे, जे भारसवाडा येथे इंडियन गॅस सिलेंडर एजन्सीशी संबंधित आहे, त्यांच्याकडे दुचाकीने जात होता. सध्या गॅस टंचाईची परिस्थिती असल्याने तो एमएच-२७-सीटी-६३८९ क्रमांकाच्या दुचाकीवर सिलेंडर घेऊन निघाला होता. दरम्यान, प्रवासात त्याचा मोबाईल हरवला. त्यानंतर त्याने दुसर्या व्यक्तीच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधून आपला मोबाईल हरवला असल्याची माहिती दिली आणि काही काळ संपर्क साधू नये, असे सांगितले. मात्र त्यानंतर काही वेळातच सार्सी-तिवसा मार्गावरील धोकादायक वळणावर त्याची दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुसरीकडे अंकुश बेपत्ता असल्यचे समजून कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र त्याचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर बुधवारी जंगल परिसरातून जात असलेल्या नागरिकांना रस्त्याखाली दुचाकीसह एक मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती स्थानिकांना दिली. ही माहिती मिळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह तिवसा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या प्रकरणी मृतकाच्या जावयाने तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, रात्रीच्या अंधारात धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने अंकुशचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे. त्यामुळे दुचाकी रस्त्याखाली खड्ड्यात कोसळून त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे टाकरखेड परिसरात शोककळा पसरली असून, तरुण वयातच काळाने हिरावून नेलेल्या अंकुशच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.