बारदाण्या अभावी हमीभाव खरेदी केंद्रावरील शेतमाल मोजणी ठप्प

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
तहसीलदारामार्फत पणन मंत्र्यांना निवेदन
 
 
कारंजा लाड, 
भोयणी येथील शासकीय Purchase process at Guaranteed Price Center हमीभाव खरेदी केंद्रावर बारदाण्याअभावी मागील अनेक दिवसांपासून खरेदी प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली असून, यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.परिणामी शासनाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, परिस्थिती अशीच राहिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीचे कोअर कमिटी सदस्य तथा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ओमप्रकाश तापडीया यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत पणन मंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी वाशीम व तहसीलदार कारंजा यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भोयणी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर ३० मार्चपासून बारदाणा उपलब्ध नसल्यामुळे खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आपला हरभरा व इतर शेतमाल बाजारात कमी दराने विकण्याची वेळ आली आहे.
 
 
nivedan
 
Purchase process at Guaranteed Price Center  सध्या खुल्या बाजारात हरभर्‍याचे दर हमीभावापेक्षा सुमारे हजार रुपयांनी कमी मिळत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी संघटनेच्या मते, जर शेतमालाच्या किमान २० टक्के उत्पादनाची देखील हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी झाली, तर शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, प्रशासनाच्या उदासीन व निष्क्रिय धोरणामुळे ही व्यवस्था कोलमडली असून, शेतकरी या सुविधेपासून वंचित राहत आहे.सध्या रब्बी हंगामातील उत्पादन बाजारात येत असताना खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकर्‍यांची अडचण अधिकच वाढली आहे. शेतमाल साठवण्याची सोय नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून, त्यांना कमी दरात माल विकावा लागत आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम होत आहे.या पार्श्वभूमीवर त्वरित बारदाणा उपलब्ध करून खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा स्पष्ट इशारा ओमप्रकाश तापडीया यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.