सापडले 400 वर्षांपूर्वीचे चांदीचे नाणे

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
सॅन्टियागो,
silver coin दक्षिण चिलीतील ‘स्ट्रेट ऑफ मॅगेलन’ जवळ पुरातत्त्वशास्त्रज्ञांना 400 वर्षांपूर्वीचे एक दुर्मीळ स्पॅनिश नाणे सापडले आहे. 16 व्या शतकातील वसाहतवाद्यांनी एका विशेष धार्मिक विधीचा भाग म्हणून हे चांदीचे नाणे तिथे ठेवले होते.
 

400-year-old Spanish silver coin, 
या शोधामुळे शतकांपूर्वी नष्ट झालेल्या एका स्पॅनिश वसाहतीचे स्थान आणि इतिहास सिद्ध करण्यास मोठी मदत झाली आहे. सँटियागो येथील बर्नार्डो ओ’हिगिन्स विद्यापीठाच्या संशोधक सोलेदाद गोन्झालेझ डायझ यांच्या नेतृत्वाखाली हे उत्खनन करण्यात आले. सापडलेले नाणे हे ‘8-रिअल’ प्रकारातील असून ते चांदीचे आहे. 16 व्या शतकात या नाण्याला ‘पीस ऑफ एइट’ असेही म्हटले जात असे. सन 1584 मधील ऐतिहासिक कागदपत्रांनुसार, जेव्हा स्पॅनिश लोक नवीन वसाहत स्थापन करत असत, तेव्हा ख्रिश्चन विधीनुसार नाणी अर्पण करण्याची प्रथा होती. हे नाणे त्याच विधीचा एक भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे नाणे ‘सिउदाद डेल रे डॉन फेलिप’ या वसाहतीच्या पहिल्या चर्चच्या पायाखालील एका दगडावर ठेवलेल्या अवस्थेत सापडले. स्पॅनिश खलाशी पेड्रो सार्मिएंटो डी गॅम्बुआ याने हे नाणे तिथे ठेवल्याची नोंद त्याच्या लेखनात आढळते. या शोधामुळे जुन्या कागदपत्रांमधील माहिती आणि प्रत्यक्ष जमिनीतील पुरावे यांचा अचूक मेळ बसला असल्याचे संशोधकांनी सांगितले. याच संशोधकांनी 2019 मध्ये गॅम्बुआच्या लेखनाचा आधार घेऊन याच ठिकाणी दोन बॉन्झच्या तोफा शोधून काढल्या होत्या.
 
 
आता या नाण्यामुळे त्या वसाहतीचा अचूक नकाशा आणि संरचनेची पुष्टी झाली आहे. मॅगेलन सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1584 मध्ये ही स्पॅनिश वसाहत स्थापन करण्यात आली होती. मात्र, ही वसाहत फार काळ टिकू शकली नाही. या शोधामुळे वसाहतवाद्यांच्या स्थापत्यशैली आणि त्यांच्या सामाजिक-धार्मिक परंपरांवर प्रकाश पडला आहे.