समाजमन सुन्न करणारी घटना
अमरावती,
accident ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे १६ वर्षीय मुलाचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला, तर त्याच्या अंत्ययात्रेसाठी भातकुलीवरून कानफोडीला जाणार्या चुलत बहिणीचाही शुक्रवारी दुपारी ट्रकने चिरडून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. समाजमन सुन्न करणारी ही घटना भातकुली येथे घडली असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुका आणि कानफोडी गावावर शोककळा पसरली आहे. नैतिक प्रदीप साबळे (१६) आणि समीक्षा ऊर्फ खुशी बाळासाहेब साबळे (१९, दोघेही रा. कानफोडी, ता. भातकुली) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बहीण-भावांची नावे आहेत. नैतिक आणि खुशी हे चुलत भावंड होती. नैतिक भातकुली येथे राहून एमएससीआयटी करत होता.
accident गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास भातकुली ते आसरा मार्गावर विरुध्द दिशेने आलेल्या एका ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीसह अन्य एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आकस्मिक मृत्यूने साबळे कुटुंब दुःखात बुडाले होते. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावतीत आणला होता. शुक्रवारी कानफोडी येथे नैतिकच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू होती. दरम्यान, या अंत्यसंस्कारासाठी भातकुली येथे राहणारी त्याची चुलत बहीण समीक्षा ही दुचाकीने कानफोडीकडे निघाली. दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास भातकुली येथील महालक्ष्मी जिनिंगजवळ विरुध्द दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने समीक्षाच्या दुचाकीला धडक दिली. इतकेच नाही तर ट्रकने समीक्षाला चिरडले, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. एकाचवेळी साबळे कुटुंबातील दोन तरुण जीव गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समीक्षा ही पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होती. या अपघात प्रकरणात भातकुली पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. नैतिकला धडक देणार्या ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुरूवारी उशिरा रात्री, तर समीक्षाला चिरडणार्या ट्रक चालकाविरुद्ध शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.