अतुल देवळे यांच्या अवयवदानातून पाच जणांना नवे आयुष्य

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
सेलू, 
सेलू येथील अभियंता Atul Deole अतुल देवळे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले आहे. दुःखाच्या डोंगरातही समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवत देवळे कुटुंबीयांनी अवयवदानाचा आदर्श घालून दिला. ४ एप्रिल रोजी झालेल्या भीषण अपघातात अतुल देवळे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस डॉटरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अखेर त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले.
 
 
Atul Deole
 
Atul Deole  या कठीण प्रसंगीही कुटुंबीयांनी धैर्याने निर्णय घेत त्यांच्या यकृत, दोन्ही किडनी आणि डोळ्यांचे दान करण्यास संमती दिली. या अवयवांमुळे पाच गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळाली असून, त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. झेडटीसीसीच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. २०१३ पासून नागपूर विभागातील हे ९३ वे अवयवदान असून चालू वर्षातील आठवे यशस्वी प्रकरण ठरले आहे. अतुल देवळे आपल्यात नसले तरी त्यांच्या अवयवांच्या माध्यमातून ते पाच जणांच्या रूपाने जिवंत राहतील. देवळे कुटुंबाचा हा निर्णय केवळ धाडसीच नाही तर समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. अवयवदान म्हणजे मृत्यूनंतरही जीवन देण्याचा सर्वोच्च मानवी धर्म हे त्यांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केले आहे.