तिथे काय उणे... बघा वाढताहेत गुन्हे!

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
वेध
प्रफुल्ल क. व्यास
Cyber ​​fraud महाराष्ट्रात झपाट्याने वाढणार्‍या सायबर फसवणुकीच्या घटना समाजाच्या प्रत्येक स्तराला स्पर्श करीत आहेत. शेअर ट्रेडिंगमध्ये प्रचंड नफा, कमी कालावधीत पैसे दुप्पट, इनसाईड टिप्स अशा गोडबोल्यांनी लोकांना जाळ्यात ओढणार्‍या टोळ्या आता अधिक संघटित, चलाख व निर्दयी झाल्याचे पावलोपावली जाणवू लागले आहे. पुण्यासारख्या शिक्षणनगरीत, जिथे जागरूकता ‘आयटी हब’मध्ये तिथेच दोन-सव्वादोन वर्षात साडेचारशे कोटी रुपयांची फसवणूक होणे धक्कादायक आहे. मोबाईलवर आलेला एक कॉल, व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला एक मेसेज किंवा सोशल मीडियावर दिसलेली एक जाहिरात यातून लोकांच्या आयुष्यभराच्या बचतीवर डल्ला मारला जातो; नव्हे बरेचदा आपण स्वत:च तो फास स्वत:च्या गळ्यात टाकून घेतो. पुण्यात २०२४ मध्ये १९७ कोटी ६१ २०२५ मध्ये १६२ कोटी १९ लाख तर २०२६ मध्ये अवघ्या ४ महिन्यात ९२ कोटी २२ लाख असे ९८२ घटनांमध्ये साडेचारशे कोटींची फसवणूक झाल्याचे पुढेे आले आहे. या व्यतिरिक्त पुण्यातील काही लोकांनी आपली फसवणूक झाली, यातून बदनामी होईल या भीतीपोटी तक्रारी दाखल केल्या नसतील. त्यांची संख्याही मोठी असण्याची शक्यता आहे. सायबर अटॅकमध्ये शिक्षित, व्यावसायिक, निवृत्त व्यक्ती सर्वच वर्गातील लोक अडकले जातात. ‘डिजिटल इंडिया’च्या युगात डिजिटल फसवणूकही तितक्याच वेगाने वाढते आहे, हे या निमित्ताने पुढे येत आहे. फसवणूक होत असल्याची जनजागृती केली जात असतानाही पुण्यासारख्या बुद्धिजीवींचे पैसे एका क्लीकमध्ये उडवण्याची शक्कल असलेले चोरटे किती हुशार असतील? विशेष म्हणजे कोणालाही ओटीपी नका, एटीएमची पिन कोणाला सांगू नका, असे आवाहन करीत असतानाही आपण फक्त आणि फक्त दुप्पटच्या मोहात अडकले जात आहोत. हा प्रताप केवळ पुण्यातच होतो आहे, असे अजिबात नाही. राज्यातच नव्हे, तर देशात ‘विश्वास’ देणार्‍यांपेक्षा ‘विश्वासघात’ करणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढते आहे.
 
 
Cyber ​​fraud
 
Cyber ​​fraud अशा घटना राज्यात, देशात होऊ लागल्या आहेत. मात्र, घडणार्‍या तुलनेत गुन्हेगार उघड होण्याची टक्केवारी नाममात्र आहे. त्यामुळे ‘दुप्पट’ पैसा करून देणार्‍यांची संख्या ‘दुप्पट’च्या वर गेली आहे. पुण्यात बुद्धी आणि पैशांनाही कमी नाही. हडपसर परिसरात वृद्ध ‘डॉक्टर’ला कमी कालावधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल १२ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. समाजात उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्या यातून सुटका नाही. नव्हे, या जाळ्यात अडकणार्‍यांमध्ये त्यांचीच संख्या आहे. लवकर श्रीमंत होण्याची इच्छा, इतरांपेक्षा पुढे जाण्याची घाई, मोठ्या परताव्याची लालसा ‡याचा गैरफायदा घेत चोरटे डल्ला मारत आहेत. बनावट प्रोफाईल तयार करून, खोटे स्क्रीनशॉट्स दाखवून, बनावट वेबसाईट्स तयार करून विश्वास निर्माण केला जातो. ‘कस्टमर केअर’च्या नावाखाली संपर्क करून लोकांची माहिती घेतली जाते. काही ठिकाणी शेतकर्‍यांना शेतीसंबंधित गुंतवणुकीच्या नावाखाली फसवले जाते तर काही ठिकाणी तरुणांकडून नोकरीच्या नावाखाली पैसे उकळले जातात. शहरांमध्ये शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली लोकांना लुबाडणूक होण्याची संख्या वाढत चालली आहे. या पृष्ठभूमीवर पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कमी वेळात जास्त नफा फसवणुकीशिवाय मिळूच शकत हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट असतानाही आम्ही मात्र दुप्पटच्या मागे लागतो आणि लाखोची रक्कम हरवून बसतो. एखाद्या गरजूला (अडचणीत असलेल्या नातेवाईकांना) आर्थिक मदत देताना हजारदा विचार केला जातो. मात्र, कमी वेळात जास्त नफा मिळविण्याच्या नादात एका मिनिटात करोडे रुपये उडवले जातात. तंत्रज्ञान जितक्या वेगाने पुढे जात आहे, तेवढ्याच वेगाने फसवणुकीची नवनवीन लढवली जात आहे. आयते खाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. या गुन्ह्यांमध्ये तरुणांचाच नव्हे, तर तरुणींचाही समावेश वाढतो आहे. राजस्थानातील एका मुलीने चक्क एका युवकाला प्रेमपाशात अडकवण्याचा प्रयत्न करून त्याची आर्थिक बाजू समजावून घेतल्याचा प्रकार गेल्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घडला. महिंद्रा कोटक नावाच्या एका फ्रॉड कंपनीने तर शेअर बाजारात टाकण्यासाठी स्वत: काही देण्याचा प्रकार घडला होता. या लोभात अनेक वर्धेकर अडकले आहेत. पावलोपावली फसगतीचा प्रकार घडत असतानाही आपण बेसावध का? फक्त पैशांसाठीच ना! पुणेकरांचाच विचार केल्यास ‘पुणेकर गुंतले, ठग फक्त हसले’ ही अजून एक नवीन म्हण प्रचलित होऊ नये म्हणजे झाले. 
 
९८८१९०३७६५