नवी दिल्ली,
Delhi Police दिल्ली पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. स्पेशल सेलने आंतरराज्यीय गुप्तहेरगिरी आणि शस्त्र तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. ही टोळी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयद्वारे चालवली जात होती. पोलिसांनी या टोळीच्या 11 सदस्यांना दिल्ली आणि पंजाबमधून अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून विदेशी आणि देशी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि अनेक संशयास्पद सिम कार्डही जप्त केले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, स्पेशल सेलच्या दोन पथकांनी देशाच्या विविध भागात आयएसआयच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाऱ्या एका नेटवर्कचा भंडाफोड केला आहे. या टोळीने शस्त्र तस्करी आणि ग्रेनेड हल्ल्यांचेही नियोजन केले होते. तसेच त्यांनी सौरऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. ज्यांचे फुटेज पाकिस्तानला पाठवले जात होते. अनेक ठिकाणांचे व्हिडिओग्राफीदेखील करण्यात आले असून ते परदेशात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पंजाब आणि दिल्लीतील व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
शस्त्र तस्करीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर
पोलिसांनी सांगितले की, या टोळीने शस्त्र तस्करीसाठी सीसीटीव्ही कॅमेèयांचा वापर केला. या कॅमेèयांमध्ये रेकॉर्डिंग होत नव्हते. त्याचे थेट प्रक्षेपण पाकिस्तानातील सूत्रधार पाहत होते. बिकानेरमध्ये कॅमेरा बसवण्याचे ठिकाण लष्कराच्या हालचालींसाठी एक प्रमुख मार्ग होता.
संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर
मिळालेल्या माहितीनुसार, बेरोजगार तरुणांना आमिष दाखवून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात होते. तपासात असे उघड झाले आहे की, शस्त्रास्त्रांच्या तस्करीसोबतच ते अमली पदार्थांच्या तस्करीचीही तयारी करत होते. दिल्लीत अटक करण्यात आलेला अतुल राठी शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे हे ऑपरेशन सांभाळत होता. ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया अॅप्सचा वापर करत होते.