सराटीच्या महिलांचा अवैध दारूविरोधात एल्गार

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
ठाणेदारांना दिले निवेदन
मारेगाव, 
Elgar against illegal liquor तालुक्यातील सराटी गावात अवैध दारूविक्री विरोधात महिलांनी जोरदार एल्गार पुकारत थेट कारवाईचा मार्ग अवलंबला. बुधवार, 9 एप्रिलला सकाळी 9.30 च्या सुमारास महिलांनी एकत्र येत गावातील संशयित अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात ‘पव्वे’ जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.
 
 
darku
 
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध धंद्याला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सराटीत अवैध देशी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत होता.
विशेषतः महिला वर्गाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दारूच्या अतिसेवनामुळे घरगुती वाद, महिलांवरील अत्याचार आणि सार्वजनिक शांततेचा भंग वाढल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
 
 
Elgar against illegal liquor  दरम्यान, संबंधितांना वारंवार समज देऊनही अवैध व्यवसाय सुरूच ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला असून काही ठिकाणी नागरिकांना धमकावल्याच्या घटनाही समोर आल्याचे निवेदनात नमूद आहे. या पार्श्वभूमीवर सराटी येथील महिलांनी मारेगाव पोलिस ठाणेदारांना निवेदन देऊन तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. अवैध दारूविक्रीवर तातडीने छापे टाकून हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली आहे. महिलांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, पाच दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास मारेगाव पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर सुजाता वनकर, प्रियांका वानखेड, विजया सोयाम, प्रीती उपरे, मंदा सपाट, मनीषा पोटे यांच्यासह अनेक महिला व ग्रामस्थांच्या सह्या आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी गावकèयांकडून जोर धरत आहे.