- अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ व सेवा सहकारी संस्थांचा इशारा
- जिल्हाधिकार्यांना निवेदन
अर्जुनी मोरगाव,
Farmers: Warning of agitation तालुक्यातील शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा १५ एप्रिलपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघातर्फे देण्यात आला आहे. यासंदर्भात अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटेनेचे नेते ललित बाळबुद्धे यांनी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदनही सादर केले आहे.
Farmers: Warning of agitation सादर निवेदनानुसार शेतकर्यांच्या विविध समस्या प्रलंबित असल्याने तालुक्यात संतापाची लाट पसरली असून, शासनाने व प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे. संघटनांच्या निवेदनानुसार, खरीप हंगामातील उर्वरित धान खरेदी तात्काळ पूर्ण करावी, यासाठी शासनाने खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच आदिवासी महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरेदी केलेल्या धानाचे प्रलंबित देयक तातडीने अदा करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू करावे, धानाला बोनस जाहीर करावा, शेतकर्यांना शेतीसाठी १६ तास अखंडित वीजपुरवठा द्यावा, तसेच वीज कनेक्शन पूर्ववत सुरू करावीत, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. धान खरेदी पूर्ण न झाल्याने व देयके वेळेत न मिळाल्याने अनेक शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्जफेड करू शकले नाहीत. शासनाने ३० जूनपर्यंत कर्जवसुलीसाठी दबाव टाकू नये, असे निर्देश दिले असतानाही बँकांकडून शेतकर्यांवर थकीत कर्जाचा बोजा टाकला जाऊ नये, अशी ठाम मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. दरम्यान, शेतकर्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता सरसकट कर्जमाफी जाहीर करून सातबारा कोरा करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, मागण्या पूर्ण न झाल्यास १५ एप्रिलपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचे स्वरूप आमरण उपोषण, रस्ता रोको, तहसील कार्यालयाला घेराव आणि गरज पडल्यास रेल्वे रोको असे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.