डीआरयूसीसी सदस्य चांदवानी यांची मागणी : महाप्रबंधकांना निवेदन
गोंदिया,
Gondia Railway Station दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक तरुण प्रकाश यांच्या गोंदिया भेटीच्या निमित्ताने, प्रवाशांच्या सोयीसुविधांचा विचार करून आ. विनोद अग्रवाल यांचे प्रतिनिधी तथा डीआरयूसीसी सदस्य विनोद चांदवानी यांनी रेल्वेगाडी क्रमांक १२२६१/१२२६२ हावडा-मुंबई दुरंतो एक्सप्रेस तसेच १२२२१/१२२२२ पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांना गोंदिया रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली. तसे निवेदनही त्यांनी यावेही महाप्रबंधकांना दिले.
Gondia Railway Station सादर निवेदनानुसार गोंदिया रेल्वे स्थानक विदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचे व व्यस्त स्थानक असून येथे दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. छत्तीसगड व मध्यप्रदेशच्या सीमेजवळ असल्यामुळे येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. असे असले तरी पुणे-—हावडा दुरंतो एक्सप्रेसला येथे थांबा नसल्याने येथील प्रवासी विशेषतः विद्यार्थ्यांना पुणे येथे ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अलीकडेच नागपूर-—हावडा दुरंतो एक्सप्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला. असे असताना, गोंदिया सारख्या महत्त्वाच्या स्थानकावर अद्याप या गाड्यांना थांबा देण्यात आलेला नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले. यावेळी मंडल रेल्वे प्रबंधक दीपककुमार गुप्ता तसेच वरिष्ठ डीसीएम दिलीप सिंह उपस्थित होते. निवेदन देतेवेळी डीआरयूसीसी सदस्य लखमीचंद रोचवानी, चीनू अजमेरा, हरीश भागवानी, मुकेश दुंबानी, सुनील बोदानी, यश नानवानी, राजू आसवानी आणि जसपाल सिंह चावला उपस्थित होते.