५ सरपंच व १६ सदस्यपदासाठी निवडणूक
कारंजा लाड,
Gram Panchayat Election तालुयातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा राजकारण रंगात आले असून, १४ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी होणार्या पोटनिवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सरपंचपदांसह सदस्यपदांसाठी इच्छुकांनी हालचाली सुरू केल्याने गावागावांत चर्चा रंगू लागल्या आहेत. या पोटनिवडणुकांमध्ये ५ सरपंच आणि १६ सदस्य पदांसाठी निवडणूक होणार असून, विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात सरपंचपदे विविध प्रवर्गांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने समीकरणे अधिकच रंगतदार बनली आहेत. बेलखेड, अंतरखेड, धोत्रा जहागीर, मोखड पिंप्री आणि बेलमंडळ या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदांसाठी वेगवेगळ्या आरक्षण प्रवर्गानुसार लढत होणार आहे.
यासोबतच सदस्यपदांसाठीही अनेक ग्रामपंचायतींमध्ये विविध प्रभागांनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. अनेक इच्छुकांनी आपापल्या गटांमध्ये बैठका घेऊन रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावपातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शयता लक्षात घेता ही निवडणूक विशेष महत्त्वाची ठरत आहे.जाहीरनिवडणूक कार्यक्रमानुसार ७ एप्रिलपासून तहसील कार्यालयात नामांकन अर्ज स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया १३ एप्रिलपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सुरू राहणार असली, तरी प्रारंभीच्या दोन दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याचे चित्र दिसून आले आहे.तर तिसर्या दिवशी धोत्रा येथील रिक्त सरपंचपदासाठी संदीप राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शयता व्यक्त केली जात आहे.
Gram Panchayat Election १५ एप्रिल रोजी छाननी, १७ एप्रिलपर्यंत अर्ज माघारीची मुदत, तसेच त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. परिस्थितीनुसार २८ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.दरम्यान, पोटनिवडणुकांच्या निमित्ताने ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क, गाठीभेटी, तसेच अंतर्गत चर्चांना सुरुवात झाली असून, गावागावांत सत्तेसाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. आगामी काही दिवसांत ही राजकीय रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.