विदर्भातल्या विद्यार्थांसाठी ५० टक्के जागा ठेवा

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची मागणी
भाऊसाहेबांना पुण्यतिथीनिमित्त मानवंदना
 
अमरावती, 
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ येथे येत्या सत्रापासून कृषी महाविद्यालय सुरु होत आहे. कृषि महाविद्यालयातील प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होत असल्याने स्थानिक विद्यार्थी कृषी शिक्षणापासून वंचित राहतो, त्यामुळे कृषी महाविद्यालयांमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवाव्या, अशी मागणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष Harshvardhan Deshmukh हर्षवर्धन देशमुख यांनी केली व त्यासाठी विदर्भातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
 
 
Harshvardhan Deshmukh
 
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ६१ व्या पुण्यतिथी निमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती भवन येथे शुक्रवारी आयोजित पुष्पांजली व मानवंदना कार्यक्रमात ते बोलत होते. विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गजानन पुंडकर, अ‍ॅड. जे. व्ही. पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशव गावंडे, सुरेश खोटरे, प्रा. सुभाष बनसोड, संस्थेचे सचिव डॉ. वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, डॉ. अमोल महल्ले, विजय ठोकळ यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
हर्षवर्धन देशमुख पुढे म्हणाले, शासनाच्या धोरणात विरोधाभास असल्याने मराठी शाळा जगवणे हे एक मोठे आव्हान होऊन बसले असून श्री शिवाजी शिक्षण संस्था त्याला अत्यंत समर्थपणे तोंड देत आहे. शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीसाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून भविष्यातही संस्थेच्या मराठी शाळा बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
 
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून Harshvardhan Deshmukh  हर्षवर्धन देशमुख यांनी कारभार हाती घेतल्यापासून या संस्थेला पक्षविरहित संस्था म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. सर्व पक्षांचा आणि पदांचा मान ठेवून ही संस्था कार्य करत आहे, त्यामुळे सर्वजण सातत्याने या संस्थेला मदत करण्यास तयार असतात, असे आमदार संजय खोडके म्हणाले. अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महापौर झाल्यानंतर पहिल्यांदाच मराठीतून भाषण केले व भाऊसाहेबांना आदरांजली अर्पण केली. संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपू इंगोले यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती भवनाच्या विकासासाठी शासनाकडे पाठविण्यात आलेला ३५ कोटीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केल्याचे सांगितले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीव सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व अमरावतीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.