ग्रामस्थांचा तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
धान्य वितरणात अनियमितता!
 
तिवसा, 
Irregularities in grain distribution! तालुक्यातील भांबोरा येथील ग्रामस्थांनी गुरूवारी तिवसा तहसील कार्यालयावर धडक देत राशन वितरणातील कथित अनियमिततेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. हक्काचे धान्य मिळालेच पाहिजे या मागणीसाठी ग्रामस्थांनी थेट तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाला धारेवर धरले. सुमारे तासभर चाललेल्या या ठिय्या आंदोलनामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली.
 
 
dkhany
 
तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिधावाटपात मोठ्या प्रमाणावर घोळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अनेक शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य मिळत नसून, त्यांच्या हक्काच्या राशनची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. भांबोरा येथील राशन दुकानदार काळमेघ यांच्याविरोधात वारंवार तक्रारी करूनही पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. अखेर महिला व पुरुषांनी एकत्र येत तहसील कार्यालयात ठिय्या देत प्रशासनाचे लक्ष वेधले.
 
 
Irregularities in grain distribution!  ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे स्पष्ट मागणी केली की, भांबोरा येथील शिधावाटप व्यवस्था तात्काळ सुधारावी आणि राशन वितरण भांबोरा नजीकच्या पालवाडी गावात नियमितपणे करण्यात यावी, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनात सुनील बुटले, शोभा इंगळे, उषा बुटले, तुलसीदास खाकसे, मालू गवळी, राहुल गडलिंग, गजानन गडलिंग, सुनील इंगळे, राजेंद्र बुटले, अविनाश मुळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता पुरवठा विभाग व तहसील प्रशासनावर कारवाईची जबाबदारी वाढली असून, तक्रारीवर नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.