सोलापूर,
Massajog मस्साजोग येथील माजी सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह गावातील अनेक घरांमध्ये मध्यरात्री घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले हे गाव आता पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आले आहे.
Massajog मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावातील किमान सात ते आठ ठिकाणी घरफोड्या केल्या. या घटनेदरम्यान दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि इतर कुटुंबीय घरात झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सकाळी उठल्यानंतर घरातील काही वस्तू गायब असल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. बीड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, केज पोलीस, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसराची सखोल पाहणी करण्यात येत आहे. चोरट्यांनी केवळ घरफोडीच केली नाही तर तलाव परिसरातील कॉपर केबल देखील चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेत गावातील इतर Massajog काही घरांमधून सोनं आणि रोकड चोरीला गेल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कॉपर केबल चोरीमुळे अंदाजे ७ लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. गावात एकाच वेळी अनेक ठिकाणी घडलेल्या या घरफोड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरातून मोठ्या किमतीचे साहित्य चोरीला गेले नसले तरी इतर घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून लवकरच आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावात घडलेल्या या सलग गुन्हेगारी घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.