मुंबई,
Monalisa case कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाच्या लग्नप्रकरणी मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात फरमान खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर पोलीस ठाण्यात फरमान खानविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याशिवाय अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. मोनालिसाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने सखोल चौकशी केली. समाजसेवक प्रथम दुबे यांनी आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांच्याकडे तक्रार केल्यानंतर 17 मार्च रोजी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने केरळपासून मध्य प्रदेशपर्यंत तपास करत तीन दिवसांत आपला अहवाल सादर केला.
तपासात मोनालिसाच्या वयाबाबत Monalisa case महत्त्वाची बाब उघड झाली. विवाहासाठी सादर करण्यात आलेले जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. केरळमध्ये विवाह नोंदणीसाठी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये तिची जन्मतारीख 1 जानेवारी 2008 अशी नमूद करण्यात आली होती. मात्र महेश्वर येथील सरकारी रुग्णालयाच्या नोंदीनुसार मोनालिसाचा खरा जन्म 30 डिसेंबर 2009 रोजी झालेला आहे.या माहितीनुसार 11 मार्च 2026 रोजी लग्नाच्या वेळी मोनालिसा केवळ 16 वर्षे आणि 2 महिन्यांची होती, म्हणजेच ती अल्पवयीन होती. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. बनावट जन्म प्रमाणपत्र महेश्वर नगरपालिकेकडून अनियमितपणे जारी करण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले असून ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, लग्नानंतरच मोनालिसाच्या कुटुंबीयांनी ती अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. तिला चित्रपटसृष्टीत आणणारे दिग्दर्शक सानोज मिश्रा यांनीही तिच्या वयाबाबत शंका उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही नोटीस बजावून तपासाचे आदेश दिले होते.संपूर्ण प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा आरोपही काही स्तरांवरून करण्यात आला असून सामाजिक आणि राजकीय स्तरावर या विषयावर तीव्र चर्चा सुरू आहे. सध्या पोलिसांकडून विविध पुरावे आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.