मुंबई
Mumbai BMC भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीची सत्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेत आल्यानंतर 2026-27 आर्थिक वर्षाच्या विकासनिधी वाटपावरून नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी राखीव ठेवलेल्या सुमारे 800 कोटी रुपयांच्या विशेष निधीच्या वितरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
स्थायी समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, निधी वाटपात मोठी तफावत दिसून येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांना प्रत्येकी सुमारे 2 ते 2.25 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे समोर आले आहे. काही प्रभावशाली नगरसेवक आणि नेत्यांना 10 ते 20 कोटी रुपयांपर्यंत निधी वितरित झाल्याचेही बोलले जात आहे. याउलट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नगरसेवकांना तसेच मनसे आणि एमआयएमच्या प्रतिनिधींना केवळ 25 लाख रुपयांचा निधी मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
25 लाख रुपयांची ही भीक आहे का?
या पार्श्वभूमीवर शिवसेना Mumbai BMC ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “हा जनतेचा पैसा असून तो समान विकासासाठी वापरला पाहिजे. मात्र सध्या महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडूनच निधीची खिरापत वाटली जात आहे. विरोधकांच्या प्रभागात जनता राहत नाही का? 25 लाख रुपयांची ही भीक आहे का?” असा सवाल करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच हा लोकशाहीचा अपमान असल्याचा आरोपही त्यांनी केला.दुसरीकडे, सत्ताधारी भाजपाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निधीचे वाटप हे नगरसेवकांनी सादर केलेल्या प्रस्तावांनुसार आणि प्रकल्पांच्या स्वरूपानुसार करण्यात आले असून यात कोणताही राजकीय भेदभाव नसल्याचा दावा करण्यात आला आहे. पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळातही अशाच प्रकारे निधी वाटप झाल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून निर्माण झालेल्या या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.