नवी दिल्ली,
ndia stands strong amidst global instability पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून त्याचे पडसाद आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतही स्पष्टपणे दिसू लागले आहेत. वाढीचा वेग मंदावल्याने अमेरिकेसमोर नवे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. ताज्या आकडेवारीनुसार २०२५ च्या अखेरीस अमेरिकेची वाढ केवळ अर्ध्या टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली, तर संपूर्ण वर्षभरातील वाढही मागील वर्षांच्या तुलनेत कमी नोंदवली गेली आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवर ताण वाढल्याचे चित्र आहे.
भारत स्थिर आणि विश्वासार्ह अर्थव्यवस्था
याउलट भारताची अर्थव्यवस्था मात्र या जागतिक अस्थिरतेतही मजबुतीने पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताच्या विकासदराचे अंदाज वाढवले असून आगामी काळातही ही वाढ कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मजबूत अंतर्गत मागणी, सुधारलेली आर्थिक परिस्थिती आणि सरकारी धोरणांमुळे भारताला या वाढीचा मोठा आधार मिळत आहे. देशातील ग्राहकांचा खर्च टिकून राहिल्याने उद्योग आणि सेवा क्षेत्राला बळ मिळत आहे. पायाभूत सुविधांवर वाढलेला खर्च, सुधारणा आणि खासगी गुंतवणूक यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. याच कारणांमुळे भारत जागतिक पातळीवर स्थिर आणि विश्वासार्ह अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे.
तथापि, जागतिक परिस्थिती पूर्णपणे स्थिर नसल्यामुळे काही धोकेही अधोरेखित करण्यात आले आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, तसेच कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे महागाईचा दबाव वाढू शकतो. जागतिक स्तरावर आर्थिक अटी कडक होत असल्याने कर्ज महाग होण्याचाही धोका व्यक्त केला जात आहे. तरीही आगामी काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार करार, वेतनवाढीचे निर्णय आणि धोरणात्मक सुधारणा यामुळे विकासाला आणखी चालना मिळू शकते. एकूणच, सध्याची परिस्थिती जागतिक आर्थिक समीकरणात बदल होत असल्याचे दर्शवते, ज्यात अमेरिका दबावाखाली असताना भारत वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ट होत आहे.