नितीश कुमारांचा नवा अध्याय; राज्यसभेसाठी घेतली शपथ

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Nitish Kumar takes oath for Rajya Sabha बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी घडामोड घडली असून माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्लीत राज्यसभा सदस्य म्हणून पदाची शपथ घेत आपल्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बिहारमध्ये नेतृत्वबदल निश्चित मानला जात असून नव्या सरकारच्या स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत झालेल्या या शपथविधीनंतर नितीश कुमार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या सोबत लल्लन सिंग आणि संजय झा हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, बिहारमध्ये नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी सत्ताधारी पक्षात बैठका सुरू असून लवकरच नव्या नेतृत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी काही दिवसांत होऊ शकतो.
 
 
 
Nitish Kumar
गेल्या काही दिवसांत नितीश कुमार यांनी विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतरच बिहारमध्ये सत्तांतराची चर्चा रंगली होती. जवळपास दोन दशकांपासून राज्याच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणारे नितीश कुमार आता राष्ट्रीय पातळीवर अधिक सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या वक्तव्यांतून स्पष्ट झाले आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना बिहारमध्ये दीर्घकाळ काम केल्यानंतर आता राजधानीतूनही काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. सत्ताधारी आघाडीतील नेत्यांनीही एकत्रितपणे पुढील वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला असून नितीश कुमार यांची कार्यपद्धती पुढे नेण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.