अशोक खरात प्रकरणात चाकणकरांच्या बहिणीला नोटीस
दिनांक :10-Apr-2026
Total Views |
पुणे,
Notice to Chakankar's sister अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असून तपासाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. शेकडो महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक झालेला खरात सध्या पोलीस कोठडीत आहे आणि त्याच्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत. या प्रकरणाशी संबंधित म्हणून काही व्यक्तींनाही आता चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्या नावावर तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर काही खाती असल्याचे तपासात समोर आले असून त्या खात्यांमधून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी महत्त्वाची मानली जात आहे.

समता पतसंस्थेत अनेक खाती एकाच दिवशी उघडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत अनेक खातेदारांची चौकशी पूर्ण झाली असून काहींनी आपल्या नावाने खाती उघडली गेल्याची माहिती नसल्याचे सांगितले आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी सुरू ठेवली असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता प्रतिभा चाकणकर चौकशीसाठी कधी हजर होतात आणि त्यांच्या जबाबातून काय उलगडा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासादरम्यान खरातकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे उघड झाले असून त्याचे नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात मोठे आर्थिक व्यवहार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, तो अनेक बँक खात्यांशी संबंधित असल्याचे आढळले आहे. शंभरहून अधिक खात्यांमध्ये त्याचे नाव लाभार्थी म्हणून जोडले गेले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.