विषय तज्ज्ञांची समिती गठित
अद्ययावत अहवाल व उपक्रमांचे नियोजन
चंद्रपूर,
Pollution Control चंद्रपूर महानगर व परिसरातील प्रदुषण नियंत्रण तसेच पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात गोंडवाना विद्यापीठ सक्रिय सहभाग घेणार असून, त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांची एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक 10 एप्रिल रोजी स्थानिक जनता महाविद्यालयात पार पडली असून, त्यात येत्या काळात कोणकोणती कामे करायची याचे नियोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते. तर विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य संदीप पोशट्टीवार, सिनेट सदस्य संजय रामगिरवार, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक मिस्त्री, विषय तज्ज्ञ डॉ. योगेश दुधपचारे, प्रा. सुरेश चोपणे, बंडू धोतरे, डॉ. महेंद्र ठाकरे, डॉ. राजीव वेगीनवार, डॉ. राजेश पेचे आदी समिती सदस्य तसेच निमंत्रक म्हणून डॉ. आशिष महातळे यावेळी उपस्थित होते.
‘विद्यापीठाने स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी योगदान द्यावे. ज्ञान आणि कौशल्याचा वापर समाजाच्या विकासासाठी करावा’, असे विद्यापीठ कायद्यातील उद्दिष्ट्यांमध्ये नमूद आहे. त्याचा आधार घेत, चंद्रपूर शहर व परिसरातील प्रदुषण नियंत्रण व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात गोंडवाना विद्यापीठाने सक्रिय योगदान द्यावे, असा ठराव 24 डिसेंबर 2024 च्या अधिसभेत संजय रामगिरवार यांनी मांडला होता. तो सर्वानुमते पारित झाला. त्यानुसार, एक समिती गठित करण्यात आली असून, त्या समितीची पहिली बैठक जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे यांच्या दालनात पार पडली.
Pollution Control येत्या काळात, चंद्रपूर महानगर व परिसरातील प्रदुषणाच्या कारणांचा शोध घेणे व उपाययोजना सूचवणे यावर अभ्यासपूर्ण आणि अद्ययावत असा अहवाल तयार केला जाणार आहे. सोबतच प्रदुषण नियंत्रण तसेच पर्यावरण संवर्धनसाठी विविध उपक्रमही राबवावे असे या बैठकीत ठरविण्यात आले. सर्व सदस्यांनी सविस्तरपणे आपले विचार मांडले. चांगल्या सूचनाही दिल्या. डॉ. कावळे यांनी बैठकीचा समारोप केला. प्रास्ताविक संजय रामगिरवार यांनी केले. डॉ. मनीष उत्तरवार यांनी आभार मानले.